सांगली : जिल्ह्यातील 105 गुंड तडीपार! | पुढारी

सांगली : जिल्ह्यातील 105 गुंड तडीपार!

सांगली ः सचिन लाड सांगली, मिरजेसह जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी दोन वर्षांत 18 टोळ्यांमधील गुंडांना तडीपार करण्यात आले. यामध्ये 105 गुंडांचा समावेश आहे. जिल्हा पोलिसप्रमुख दीक्षित गेडाम यांनी कारवाईचा हा दणका दिला आहे. आणखी ‘डझन’भर टोळ्या कारवाईच्या रडारवर आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडीचे गुन्हे करणार्‍या अनेक टोळ्या जिल्ह्यात आहेत. टोळीप्रमुखांसह त्यांच्या साथीदारांना अनेकदा कारवाईचा हिसका दाखविण्यात आला आहे. तरीही त्यांच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच राहतात. या टोळ्यांतील गुन्हेगारांना तडीपार करण्याचा निर्णय घेतला जातो.

संघटित होऊन गुन्हे करणार्‍या या टोळ्यांवर किती आणि कोणत्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत, याची माहिती काढली जाते. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध तडीपारीचा प्रस्ताव तयार करून तो जिल्हा पोलिसप्रमुखांना सादर केला जातो. गेल्या अडीच वर्षात एकूण 18 टोळ्या पोलिसांच्या ‘रडार’वर आल्या. पोलिसप्रमुख दीक्षित गेडाम यांनी या टोळ्यांतील 79 गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले. टोळ्याशिवाय अन्य 26 गुन्हेगारांनाही तडीपार केले आहे. त्यांच्याविरुद्धही बेकायदा हत्यार बाळगणे, दहशत माजविणे, खंडणी वसुली, मारामारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

अवघ्या दोन महिन्यांवर आता गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. उत्सवकाळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी काढण्याचे काम सुरू आहे. त्यांना उत्सवकाळापुरते किमान पंधरा दिवस तरी तडीपार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एक किंवा दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांना कायद्याची भीती बसत आहे. अनेक गुन्हेगार तडीपारी आदेश घेऊन दुसर्‍या जिल्ह्यात आश्रयाला जाऊन गुन्हे करीत असल्याचे समोर आले आहे. आपल्या जिल्ह्यात बाहेरील जिल्ह्यातील तडीपार गुंड आश्रयाला आहेत. त्यामुळे जे गुन्हे घडत आहेत, यामागे या गुन्हेगारांचा हात असू शकतो. अशा गुन्हेगारांवर ‘नजर’ ठेवण्याची गरज आहे. परजिल्ह्यातील पोलिसांसोबत समन्वय ठेवण्याची गरज आहे.

संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्याची गरज
जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी टोळ्यांनी चांगलेच बस्तान बसविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या टोळ्यांना जरी तडीपार केले जात असले तरी त्यांच्या पडद्याआड राहून गुन्हेगारी कारवाया सुरुच आहेत. पोलिसांची ‘नजर’ चुकवून ते पुन्हा जिल्ह्यात येत आहेत. आता या टोळ्यांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्‍का) कायद्यांर्गत कारवाईचा बडगा उगारण्याची गरज आहे.

तडीपार कारवाईवर नजर
2020 : 3 टोळ्या
2021 : 12 टोळ्या
2022 : 3 टोळ्या
18 टोळ्यात 79 गुंड
एकूण 105 गुंड तडीपार

Back to top button