मिरज : अनेक सावकार बँक, पतसंस्थांत पदाधिकारी | पुढारी

मिरज : अनेक सावकार बँक, पतसंस्थांत पदाधिकारी

मिरज; पुढारी वृत्तसेवा : म्हैसाळ (ता. मिरज) येथे सावकारी कर्जातून नऊ जणांनी आत्महत्या केली होती. त्याप्रकरणी अटकेत असलेले अनेकजण बँक, पंतसंस्थांवर पदाधिकारी आहेत. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. फरारी सावकार आणि मांत्रिकांचा देखील शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.

म्हैसाळ व आसपासच्या गावात पशुवैद्यकीय डॉक्टर माणिक वनमोरे यांची चांगली प्रॅक्टीस होती. तसेच शिक्षक पोपट वनमोरे देखील रयत शिक्षण संस्थेत असल्याने दोन्ही सधन कुटुंबे होती. दोघांनी गावातील बँक आणि पतसंस्थांमध्ये ठेव पावत्या केल्या होत्या. त्यातून सर्वांची वनमोरे यांची ओळख झाली होती.

परंतु गुप्तधनाच्या हव्यासापोटी मांत्रिकाच्या नादी लागून त्यांनी सर्व ठेव पावत्या मोडल्या. बँक, पतसंस्था, खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन वनमोरे यांनी मांत्रिकाला कोट्यवधी रुपये दिले असल्याची शक्यता आहे. त्या द‍ृष्टीने धागेदोरे देखील पोलिसांच्या हाती लागले आहेत. पोलिस मांत्रिकाच्या मागावर आहेत. परंतु आत्महत्येची घटना कळताच मांत्रिकांनीदेखील धूम ठोकली आहे.

दरम्यान, अटकेत असलेले दोन-तीनजण खासगी सावकारी करतात. तर काहीजण हे बँक, पंतसंस्थांवर पदाधिकारी आहेत. या संस्थांमधून स्वत:च्या नावावर कर्ज काढून ते गावात खासगी सावकारी करीत असल्याची चर्चा आहे. त्या दृष्टीने देखील पोलिस तपास करीत आहेत. संशयितांनी किती कर्ज दाखवले आहे, गावात कोणाकोणाला पैसे दिले आहेत, वनमोरे यांना किती पैसे दिले, वसुलीसाठी किती त्रास दिला, याचा तपास करण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणात दोन मांत्रिकांची नावे पुढे आली आहेत. त्यांच्या मागावर सात पथके रवाना केली आहेत. तसेच वनमोरे यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत 25 जणांची नावे आहेत. यातील 18 जणांना अटक केली आहे. उर्वरित सावकार फरारी झाले आहेत. यातील एकास कोरोनाची लागण झाल्याचे समजते. त्याच्या मागावर पोलिस रवाना करण्यात आले आहेत.

सर्व संशयितांची पोलिस कोठडी उद्या (सोमवारी) संपणार आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पण या प्रकरणातील अजून काही संशयित फरारी आहेत. तसेच तपास देखील अपूर्ण आहे. त्यामुळे पोलिस संशयितांची कोठडी वाढवून मागणार असल्याचे सांगण्यात आले.

सावकारांचा ‘तो मी नव्हेच’ कांगावा…

पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये काही सावकारांची नावे आहेत. सुरुवातीला सावकारांनी ‘आमचेच बँकेत, पतसंस्थेत कर्ज आहे. आम्ही कशी सावकारी करणार?’ असा कांगावा केला होता. परंतु बँक, पतसंस्थेमध्ये पदाधिकारी होऊ न स्वत:च्या नावावर कर्ज दाखवून अनेकजण गावात खासगी सावकारी करीत असल्याची चर्चा आहे.

Back to top button