सांगली : ‘त्या’ मांत्रिकाचे वनमोरेंच्या घरी हेलपाटे | पुढारी

सांगली : ‘त्या’ मांत्रिकाचे वनमोरेंच्या घरी हेलपाटे

सांगली : पुढारी वृत्तसेवा गुप्तधनाचे आमिष दाखविणार्‍या ‘त्या’ तथाकथित मांत्रिकाने म्हैसाळ (ता. मिरज) येथील वनमोरे कुटुंबाच्या घरी अनेकदा हेलपाटे मारले होते, अशी माहिती खुद्द नातेवाईकांनीच पोलिसांना दिली आहे. मांत्रिकाने वनमोरे कुटुंबाला घरातील गुप्तधन शोधण्याबरोबर पैशाचा पाऊस पाडण्याचे अमिष दाखविल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिस आपल्या मागावर असल्याची चाहूल लागताच हा मांत्रिक परागंदा झाला आहे. त्याच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) विभागाची सात पथके कर्नाटकसह, सोलापूर जिल्ह्यात तळ ठोकून आहेत.

गेल्या आठवड्यात वनमोरे कुटुंबाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. सावकारी कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे कारण सुरुवातीला पुढे आले होते. पण, आता गुप्तधन व पैशाचा पाऊस पाऊस, हेही कारण पुढे आले आहे. जिल्हा पोलिस प्रमुख दीक्षित गेडाम यांनी खुद्द या आत्महत्येमागील अन्य कारणांचा शोध घेतला जाईल, असे सांगितले होते. त्यानुसार एलसीबीची सात पथके या तपासात गुंतली आहेत. मांत्रिक सापडल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येणार आहेत.

मृत शुभम माने हा मांत्रिकाच्या संपर्कात होता, अशी माहिती पथकांना मिळाली आहे. हा मांत्रिक अनेकदा वनमोरे यांच्या घरी येऊन गेला होता, असेही समजले आहे. मांत्रिकाला पैसे देण्यासाठी या कुटुंबाने खासगी सावकार तसेच गावातील काही लोकांकडून पैसे घेतले होते. सध्या अटकेतील संशयितांकडे कसून चौकशी केली जात आहे. अनेक संशयित ‘वनमोरे कुटुंबाला पैसे दिलेच नाहीत, आम्हाला जाणीवपूर्वक अडकविण्यात आले आहे’, असा कांगावा करीत आहेत. या सगळ्या शक्यता गृहीत धरून पोलिस यंत्रणा तपास करीत आहे. मात्र, अजून तरी ठोस असे काही पोलिसांच्या हाती लागलेले दिसत नाही.

विच्छेदन तपासणी अहवालाकडे लक्ष
नऊ जणांच्या मृतदेहाची मिरजेतील शासकीय रुग्णालयात विच्छेदन तपासणी केली. मात्र, वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणीचा अहवाल राखून ठेवल्याने मृृत्यूचे कारण व वेळ, याचा उलघडा झालेला नाही. अंतिम अहवाल आल्यानंतर ही बाब समोर येईल.

Back to top button