नागज; पुढारी वृत्तसेवा : ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील नेताजी उत्तम देसाई व पतंग धोंडीराम देसाई यांच्या मेंढ्यांच्या कळपावर वीज पडल्याने 24 मेंढ्या ठार झाल्या. त्यांचे चार लाख ऐंशी हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना गुरुवारी रात्री
घडली.
कवठेमहांकाळ तालुक्याच्या दुष्काळी पट्ट्यात गुरुवारी दुपारपासून विजांचा कडकडाटासह पावसाचा जोर सुरू आहे. गुरुवारी रात्रभर व शक्रवारी दुपारी दोन वाजेपर्यंत पावसाची संततधार सुरू होती. गुरुवारी रात्री ढालगाव येथील दत्तनगर मळ्यात देसाई यांच्या घराजवळ वीज पडल्याने मेंढ्याच्या कळपातील 24 मेंढ्यांचा मृत्यू झाला.
कवठेमहांकाळचे तहसीलदार बी. जी. गोरे, तालुका पशुधन अधिकारी प्रेमचंद पाटील, सहाय्यक पशुधन अधिकारी ओंकार कुलकर्णी, तलाठी कपिल सयाम यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
पावसाने परिसरातील अनेकांच्या घराची पडझड झाल्याचे वृत्त आहे. कवठेमहांकाळ येथील शेरखान बागवान यांच्या मालकीच्या तीन शेळ्या वीज पडल्याने ठार झाल्या आहेत.