इस्लामपूर : अनैतिक संंबंधाच्या संशयावरून पत्नीचा खून पतीस अटक | पुढारी

इस्लामपूर : अनैतिक संंबंधाच्या संशयावरून पत्नीचा खून पतीस अटक

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : वाळवा तालुक्यातील तुजारपूर येथील प्रियांका सुनील गुरव (वय 28) या विवाहितेचा पतीनेच अनैतिक संंबंधाच्या संशयावरूनच गळा आवळून खून केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी पती सुनील तानाजी गुरव (वय 31) याला पोलिसांनी अटक केली आहे. खुनाचा हा प्रकार मंगळवारी रात्री वाघवाडी परिसरात घडला होता. बुधवारी तो उघडकीस आला होता.

बुधवारी सायंकाळी वाघवाडी येथील बांदल शिवारात प्रियांका हिचा मृतदेह आढळून आला होता. घटनास्थळावर मृतदेहाची ओळख पटण्यासाठी कोणताच पुरावा नव्हता. त्यामुळे ओळख पटविणे पोलिसांसमोर आव्हान होते. मृतदेहाच्या शेजारी असलेल्या पिशवीत इस्लामपूर पोलिस ठाण्याचे नाव व नंबर लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीवरील अक्षर याच पोलिस ठाण्याचे कर्मचारी योगेश जाधव यांचे होते. त्यांनी या महिलेला हा नंबर लिहून दिला होता. त्यामुळे ही महिला तुजारपूरची असल्याचे स्पष्ट झाले.

मृतदेहाची ओळख पटल्यानंतर इस्लामपूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे, हवलदार दीपक ठोंबरे, अरुण पाटील, सचिन सुतार, आलमगीर लतीफ यांच्या पथकाने तपासाची सुत्रे हलवित सुनील गुरव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता हा खून त्यानेच केल्याची कबुली दिली.

याबाबत माहिती देताना सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी सांगितले की, मृत प्रियांका हिचे बाहेर अनैतिक संबंध असावेत, या संशयावरून तिच्यात व सुनील याच्यात गेल्या पाच-सहा महिन्यापासून वाद सुरू होता. हा वाद पोलिस ठाण्यापर्यंतही आला होता. सततच्या भांडणामुळे गेल्या 15 दिवसांपासून प्रियांका ही घराबाहेरच होती. ती येथील बसस्थानक परिसरात वावरत होती.

मंगळवार, दि. 14 रोजी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास सुनील याने पत्नी प्रियांका हिला इस्लामपूर बसस्थानक येथून गोड बोलून ‘आपण बाहेर कोठेतरी एकत्र बसून चर्चेने वाद मिटवू’, असे सांगून मोटारसायकलवर बसवून तिला वाघवाडी येथील तानाजी बांदल यांच्या शेतात नेले. तेथे तिला बोलण्यात गुंतवून ती बेसावध असताना ओढणीने तिचा गळा आवळला. ती मृत झाल्याची खात्री होत नसल्याने तिचे डोके मातीत आदळून तो घटनास्थळावरून पळून गेला. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली असून शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे तपास करीत आहेत.

Back to top button