मिरज : साडेतीन लाखांच्या बनावट नोटा जप्त

मिरज : साडेतीन लाखांच्या बनावट नोटा जप्त

मिरज ; पुढारी वृत्तसेवा : मिरजेत पोेलिसांनी छापा टाकून 3 लाख 56 हजार 170 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. जिल्ह्यातील बनावट नोटांचे कनेक्शन पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.

उमर खुदबुद्दीन एकसंबेकर (रा. सोमवार पेठ, कागल, जि. कोल्हापूर), नदीम सज्जान नालबंद (रा. नदीवेस नाका, इचलकरंजी, जि. कोल्हापूर) आणि शब्बीर साहेबहुसेन पिरजादे (रा. गुरुवार पेठ, मिरज, जि. सांगली) अशी अटक केलल्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता दि. 10 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तिघे संशयित हे बनावट नोटा घेऊन मिरजेतून कृष्णाघाटच्या दिशेने एका कारमधून जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलिसांचे एक पथक मंगळवारी मध्यरात्री कृष्णाघाट रस्त्यावर तैनात करण्यात आले होते. खबर्‍याने दिलेल्या माहिती प्रमाणे विनानंबर प्लेटची कार कृष्णाघाट रस्त्यावरील एका वीटभट्टीजवळ आल्यानंतर पोलिसांनी त्या कारवर छापा टाकला.

कारची तपासणी केली असता त्यामध्ये 'भारतीय बच्चो का बँक' असा उल्लेख असलेल्या नोटांची 55 बंडल सापडले. परंतु बनावट नोटा ओळखून येऊ नयेत यासाठी त्या बंडलच्यावर पाचशे रुपयांच्या काही खर्‍या नोटा लावण्यात आल्या होत्या. तसेच दोन हजार रुपयांच्या नोटेसारखे हुबेहुब दिसणारे 'भारतीय बच्चों का बँक' असा उल्लेख असलेल्या व त्यावर दोन हजार रुपये असा उल्लेख असलेले 45 बंडल मिळून आले. पोलिसांनी संशयितांंकडून बनावट नोटा जप्त केल्या आहेत.

वरील तिघे कोणालातरी आर्थिक गंडा घालण्याच्या उद्देशाने बनावट नोटा घेऊन जात असल्याचा पोलिसांचा संशय आहे. पोलिसांनी तिघांकडून 3 लाख 56 हजार 170 रुपये किंमतीच्या बनावट नोटा, विना नंबर प्लेट कार आणि चार मोबाईल जप्त केले. त्यांच्या विरुद्ध आर्थिक फसवणुकीचा प्रयत्न आणि मोटार वाहन कायदा भंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news