सांगलीमध्ये पोलिसावर हल्ला | पुढारी

सांगलीमध्ये पोलिसावर हल्ला

सांगली ः पुढारी वृत्तसेवा कौटुंबिक वाद मिटविण्यासाठी गेलेले संजयनगर पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार अमोल नायर यांच्यावर हल्ला करण्यात आला. सह्याद्रीनगरजवळ शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सह्याद्रीनगर येथील मोकाशी कुटुंबातील सख्ख्या भावांमध्ये कौटुंबिक विषयावरून वाद झाला. त्याचे पर्यवसान मारामारीत झाले.

ही मारामारी रस्त्यावर आली. एका भावाने चाकू घेऊन प्रचंड दहशत माजविली. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. संजयनगर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. याच परिसरात हवालदार अमोल नायर गस्त घालत होते. साहाय्यक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर यांनी नायर यांना घटनास्थळी पाठविले.

नायर यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोघे भाऊ ‘हा आमचा कौटुंबिक प्रश्न आहे. तुमचा काय संबंध’, असे म्हणून नायर यांच्या अंगावर धावून गेले. त्यांना धक्काबुक्की केली. यात नायर किरकोळ जखमी झाले. त्यानंतर आणखी काही पोलिस बोलविण्यात आले. पोलिसांनी मोकाशी भावांना ताब्यात घेतले. नायर यांना उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल केले. रात्री उशिरा नायर यांची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे साहाय्यक निरीक्षक संजय क्षीरसागर यांनी सांगितले.

Back to top button