सांगली : पुढारी वृत्तसेवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकदिनी सोमवारी (दि. 6) सांगलीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर अखंड तेवत राहणारी शिवज्योत प्रज्वलित केली जाणार आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, अशी माहिती काँग्रेसचे नेते पृथ्वीराज पाटील व उपक्रमाची संकल्पना मांडणारे वीरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, पृथ्वीराज पाटील फाऊंडेशन, गुलाबराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व सर्व शिवप्रेमी यांच्यामार्फत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सांगली महापालिका आणि शिवप्रेमींच्यावतीने या उपक्रमाला संमती मिळाली आहे. रायगडावरून शिवज्योत सांगली येथे आणण्यात येणार आहे. टिळक चौक ते मारूती चौकापर्यंत मिरवणुकीने ज्योत आणली जाईल. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मारूती चौकातील पुतळ्याजवळ ज्योत कायमस्वरूपी तेवत ठेवली जाणार आहे.
या शिवज्योत स्थापनेसाठी स्वराज्यातील सिंहगड, अजिंक्यतारा, प्रतापगड, पन्हाळगड, रायगड या पाच किल्ल्यांवरील माती तर कृष्णा, कोयना, पंचगंगा, वेण्णा, सावित्री या नद्यांचे पाणी आणण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर अखंड तेवत राहणारी ही देशातील पहिलीच शिवज्योत असणार आहे. नैसर्गिक संकटातही ही ज्योत कायमस्वरूपी तेवत राहण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर केला आहे. सर्व खर्च पृथ्वीराज पाटील फाऊंडेशन, गुलाबराव पाटीलइ चॅरिटेबल ट्रस्ट करणार आहे. शिवछत्रपतींना नमन करण्यासाठी सर्वांनी सायंकाळी सहा वाजता या सोहळ्यास शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पृथ्वीराज पाटील यांनी केले.