माई… तुमची आठवण येतच राहील | पुढारी

माई... तुमची आठवण येतच राहील

गोटखिंडी (ता. वाळवा) येथील कै. सौ. सुशीला आनंदराव पाटील (माई) यांचे आज द्वितीय पुण्यस्मरण. त्यांच्याबद्दलच्या आठवणी… त्यानिमित्त… माई यांचे माहेर पलूस तालुक्यातील भिलवडी. बहिणी व भाऊ सर्वजण शिक्षण क्षेत्रात कार्यरत. माई गोटखिंडी येथील रामचंद्र गणपती पाटील (गुरुजी) यांचे थोरले सुपुत्र ए. आर. पाटील (आबा) यांच्याशी विवाह करून सासरी आल्या. त्यावेळी गोटखिंडीत चार दशकांपूर्वी च.अ.,इ.शव एवढ्या खूप शिकलेल्या म्हणून त्यांचा आदर होता. लग्नाच्या दोन दिवसानंतर आबा व माई शिरगाव हायस्कूल, शिरगाव (ता. देवगड) येथे कामावर रुजूही झाले. वाळवा तालुका शिक्षण संस्था इस्लामपूर संस्थेत 33 वर्षे सेवा केली. त्यानंतर दोघेही सेवानिवृत्त झाले.

मंगळवार हा शुभ दिवस. पण तो माईंच्या व त्यांच्यावर प्रेम करणार्‍यांसाठी अशुभ ठरला. 26 मे 2020 या दिवशी मृत्यूने माईच्या मानेभोवती आपले अजस्र हात आवळले. किरकोळ, आजारपण (सर्दी, खोकला) सोडता माईंना एकही औषधाची गोळी कधी नव्हती. शेवटच्या क्षणापर्यंत आबा व माई एकत्र हसत, गप्पा मारत होत्या. सांगली येथे आपल्या मुलाची व सुनेची भेट घेण्याच्या उद्देशाने मुलाच्या घरी गेल्या होत्या. परंतु त्यांची फक्त सून सौ. धनश्री यांच्याशीच भेट झाली.

तीच त्यांची शेवटची भेट. घरी परतत असताना एक किलोमीटर गोटखिंडी गाव आले असताना मोटारसायकलच्या आडवे अचानक कुत्रे आले व त्यात माईंचा गाडीवरून तोल गेला. त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार झाले. परंतु उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही. दुसर्‍या दिवशी त्या देवास प्रिय झाल्या. मूकपणाने त्या मृत्यूला सामोरे गेल्या. अशा आवडत्या माई सर्वांना अचानकपणे सोडून जातील, असे कधीच वाटले नव्हते.

ज्यांना आपले माणूस म्हणावे अशा माई भावविश्वाशी एकरूप होत्या. शब्दगंधाच्या वसंत सोबतीला घेऊन तुम्ही ए. आर. पाटील (आबांच्या) आयुष्यात आला. सरांच्या मुलांमधील दोषांना सामावून घेणारी सहपूर्णांक झाला. सर्वांना जीव लावलात, आपलंसं केलंत तुम्ही! आणि निघूनही गेलात. तुमची नात वेदश्री अजुनी बसता- उठता आठवण काढते. तुमचा तो सुसंस्कृतपणा अजूनही सर्वांना आठवतो. तुमचा तो डोक्यावरील पदर जो तुम्ही कधीही पडू दिलेला नाही. आयुष्यभर मोटारसायकलीवरून प्रवास करतानासुद्धा पडू दिलेला नाही. या तुमच्या आठवणींचा उजाळा.मा

– स्वप्नील पाटील, सांगली

Back to top button