

कवठेमहांकाळ : पुढारी वृत्तसेवा
विठुरायाचीवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बन्नाप्पा बाळासो म्हारनूर (वय 21) या तरुणाचा अज्ञात कारणावरून अज्ञातांनी धारदार हत्यार आणि डोक्यात दगड घालून खून केला. गुरुवारी सकाळी ही घटना घडली. या घटनेची कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी रॉबिन श्रीकांत खोत (वय 22, पिंपळवाडी) संजय आप्पा गगणमाले (वय 33, रा. शिवाजीनगर कवठेमहांकाळ) या दोन संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, विठुरायाचीवाडी येथे एका शेडजवळ तरुणाचा डोक्यात दगड घालून खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तात्काळ पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी करे, सागर गोडे हे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी बन्नाप्पा म्हारनूर हा पोलिसांना रक्ताच्या थारोळ्यात आढळला. बन्नाप्पा याच्यावर अज्ञातांनी धारदार हत्याराने वार करुन डोक्यात दगड घालून डोके ठेचल्याचे तपासात निष्पन्न झाले.
घटनास्थळी पोलिस उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. पोलिसांनी घटनास्थळावरून गुन्ह्यात वापरलेला दगड ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी खूनप्रकरणी संशयित खोत व गगणमाले यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. लवकरच खुनाचा उलगडा होईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी दिली.