मिरज : मटका घ्यायचा असल्यास पाच हजार हप्ता दे! | पुढारी

मिरज : मटका घ्यायचा असल्यास पाच हजार हप्ता दे!

मिरज; पुढारी वृत्तसेवा : मटक्याचा व्यवसाय व्यवस्थित चालवायचा असेल तर पाच हजार रुपये हप्ता देण्याची मागणी करून कोयत्याने धमकाविण्याचा प्रकार मिरजेत घडला. याप्रकरणी मोहीन जाफर बानदार (रा. गुरुवारपेठ, मिरज) याला मिरज शहर पोलिसांनी अटक केली. याबाबत शमशुद्दीन दादापीर कोतवाल यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

शुमशुद्दीन कोतवाल यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचा टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हलसचा व्यवसाय आहे. दि. 29 मे रोजी मोहीन बानदार याने त्यांना फोन करून एक हजार रुपये देण्याची मागणी केली. त्यावेळी कोतवाल यांनी हजार रुपये देण्यास नकार दिला होता. पैसे देण्यास नकार दिल्याने बानदार हा दि. 30 मे रोजी सायंकाळी कोयता घेवून कोतवाल यांच्या घरात गेला. त्यावेळी त्याने कोतवाल यांच्याकडे तातडीने पाच हजार रुपये देण्याची मागणी केली.

पैसे मागितल्यानंतर कोतवाल यांनी बानदार याला “मी तुला पाच हजार रुपये कशासाठी देऊ ”, अशी विचारणा केली. त्यावेळी बानदार याने “तुझा मटक्याचा धंदा आहे, तो व्यवस्थित चालवायचा असल्यास मला पाच हजार रुपये हप्ता द्यावा लागेल”, असे म्हणून त्यांच्या अंगावर कोयता घेवून धावून गेला. त्याचवेळी त्या परिसरात पोलिस आल्याचे पाहून बानदार याने तेथून हत्यारासह मोटारसायकलवरुन पलायन केले होते. धमकी देऊन पाच हजार रुपयांचा हप्ता मागितल्याप्रकरणी मिरज शहर पोलिसांनी मोहीन बानदार याला अटक केली आहे. याबाबत मिरज शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Back to top button