

शिराळा शहर : शिराळा तालुक्यातील आरळा, अंत्री बुद्रुक, अस्वलेवाडी, गवळेवाडी, गिरजवडे, गुढे, खराळे, मणदूर, रेड, रांजणवाडी, टाकवे, वाकुर्डे खुर्द, येळापूर, देववाडी, नाठवडे, शिरसाटवाडी, शिरशी, सोनवडे, नाटोली, पाडळी या गावांच्या पाणी योजना 30 एप्रिलअखेर पूर्ण करणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी संयुक्त पाणी संघर्ष कृती समितीस कळविले आहे.
शिराळा पंचायत समितीसमोर कांदे, भाटशिरगावसह शिराळा तालुक्यातील पाणी योजनांची प्रलंबित कामे पूर्ण करण्याबाबत 12 व 13 फेब्रुवारीरोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. यावेळी कांदे, भाटशिरगाव, नाटोली, निगडी, उपवळे या गावांना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय येवले यांनी कामे पूर्ण करण्याबाबत लेखी पत्र दिले होते. तसेच संयुक्त पाणी संघर्ष समितीने यावेळी तालुक्यातील उर्वरित 34 गावांच्या पाणी योजनांची कामे पूर्ण करण्याबाबतचे कालबद्ध नियोजन देण्याची मागणी केली होती. यानुसार शिराळा तालुक्यातील 34 गावांमध्ये जलजीवन मिशन योजनेची प्रलंबित कामे पूर्ण करण्याबाबतचा कालबद्ध कार्यक्रम कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद सांगली यांनी संयुक्त पाणी संघर्ष कृती समितीस लेखी कळविला आहे. या अहवालाद्वारे आंबेवाडी, औंढी, बेलेवाडी, चिखली, चिखलवाडी, इंग्रुळ, कणदूर, करमाळे, मानेवाडी, मेणी, मोरेवाडी, पाचुंब्री, पुनवत, सावंतवाडी या गावांतील जलजीवन मिशन योजनेची कामे 31 मार्चअखेर होणार आहेत.
शिराळा तालुक्यातील सर्व प्रलंबित पाणी योजनांच्या पूर्ततेबाबत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने कालबद्ध कार्यक्रम दिला आहे. यानुसार कामे जलदगतीने व योग्य दर्जा राखत व्हावीत, याकरिता सर्व संबंधित गावांच्या ग्रामपंचायतींनी दक्ष राहणे आवश्यक आहे. याकरिता संयुक्त पाणी संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल. तसेच तालुक्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रसंगी तीव्र आंदोलनाचीही तयारी ठेवली असल्याचा इशारा संयुक्त पाणी संघर्ष कृती समितीचे शिराळा तालुका समन्वयक कैलास देसाई यांनी दिला आहे.