पेठनाक्यावर प्रवाशाला मारहाण करून लुटले | पुढारी

पेठनाक्यावर प्रवाशाला मारहाण करून लुटले

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : गावाकडे निघालेल्या प्रवाशाला पेठनाका (ता. वाळवा) येथे दोघाजणांनी अडवून दांडक्याने मारहाण केली. त्याच्याकडील रोकड, पिशव्या जबरदस्तीने काढून घेतल्या. हा जबरी चोरीचा प्रकार रविवारी पहाटे घडला.

या मारहाणीत विश्वास आनंदा देसाई (वय 45, रा. भाटशिरगाव, ता. शिराळा, जि. सांगली) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर इस्लामापुरातील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. देसाई यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, विश्वास यांचे भाऊ संदीप हा मुंबई येथे राहायला आहेत. विश्वास हे काही दिवसांपूर्वी कामानिमित्त संदीप यांच्याकडे गेले होते. रविवारी ते गावाकडे जाण्यासाठी मुंबईहून बसने निघाले. रविवारी पहाटे 2.15 वाजण्याच्या सुमारास पेठनाका येथे उतरले. गावाकडे जाण्यासाठी वाहन नसल्याने शिराळ्याकडे जाणार्‍या रस्त्यावर विश्वास हे थांबले होते. गाडी न मिळाल्याने विश्वास हे चहा पिण्यासाठी कराडच्या दिशेला सेवा रस्त्याने गेले. विश्वास हे रस्त्याच्या बाजूला आडोशाला थांबले होते. त्यांनी हातातील पिशव्या खाली ठेवल्या. त्यावेळी विश्वास यांच्या पाठीमागून अनोळखी दोघेजण आले. विश्वास यांना, ‘इधर क्या कर रहे हो’, असे म्हणत त्यातील एकाने बाजूस पडलेले दांडके घेवून विश्वास यांच्या डोक्यात, छातीवर व खांद्यावर मारहाण केली. त्यावेळी दुसर्‍या एकाने झटापट करून जबरदस्तीने विश्वास यांच्या पँन्टच्या खिशातील पाकीटातील 4 हजार रुपये काढून घेतले. विश्वास यांच्या दोन बॅगा घेवून ते तेथून पळून गेले.

Back to top button