सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून 203 कोटी कर्जास मंजुरी | पुढारी

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून 203 कोटी कर्जास मंजुरी

सांगली : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मंगळवारी 203.13 कोटी रुपयांच्या कर्जवाटपास मंजुरी दिली. त्यात साखर कारखान्यांना 160 कोटी रुपयांची हंगामपूर्व अल्पमुदत कर्ज, सूतगिरणीसाठी 20 कोटींच्या कर्जाचा समावेश आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी पत्रकारांना दिली.

आ. नाईक म्हणाले, बँकेकडे दीड हजार कोटी रुपयांच्या ठेवी शिल्लक आहेत. अन्य बँकांप्रमाणे जिल्हा बँकही चांगल्या कर्जदारांच्या शोधात आहे. त्याअंतर्गत यावर्षी जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांना कर्जे घेण्याचे आवाहन केले आहे. हंगामपूर्व कर्जे सुरू झालेली आहेत. याशिवाय कारखाना सुरू झाल्यानंतर साखर कारखान्यांकडून किमान 700 कोटींची कर्ज उचल अपेक्षित आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कर्ज मंजुरी संदर्भात बैठक झाली. त्यात जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांना 160 कोटी रुपयांची पूर्व हंगामी कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना जत शाखा,

कारंदवाडी शाखा प्रत्येकी 25कोटी, विश्वासराव नाईक कारखाना 30 कोटी, मोहनराव शिंदे 20 कोटी, उदगीर कारखाना 30 कोटी, सदगुरु कारखाना 30 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. दीनदयाळ सुतगिरणीस वीस कोटी आणि इंडिया गारमेंट नूतनीकरणास 50 लाखाचे कर्ज दिले आहे.

ते म्हणाले, शेतीसाठी मध्यम व दीर्घ मुदत 346 सभासदांना 5 कोटी97 लाख, 2 मजूर संस्थांना- 16 लाख, एका दूध संघास 8 लाख, शेत जमीन खरेदीसाठी एकास 6 लाख, ऱिटेल फायनान्स -तीन सभासदास 5 लाख, एका सभासदास थेट कर्जे- 14 लाख, कॅश क्रेडिट नूतनीकरण-तीन सभासदास 59 लाख, प्रॉपट्रीवर 12 सभासदांना 1 कोटी 90 लाख, घरबांधणीसाठी 24 सभासदांना 3 कोटी54 लाख, शेतकरी घरबांधणीसाठी 17 सभासदांना 2 कोटी 57 लाख, सेवक घरबांधणीसाठी 25 लाख, पगारदार नोकर कर्ज 66 सभासदांना 5 कोटी12 लाख, दोन बचत गटांना 3 लाख, संयुक्त कर्जे- 6 गट, 10 लाख, वाहन कर्जे- 87 लाख,सेवक कर्ज, संख्या सात, 60 लाख रुपये आदीचा समावेश आहे.

थकीत असलेल्या संस्थांच्या कर्ज वसुलीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. वसुलीत कोणत्याही अडचणी नाहीत. बँकेकडे मोठ्या प्रमाणात ठेवी असून, आम्ही चांगल्या कर्जदारांच्या शोधात आहोत. काही नवीन कारखान्यांनी कर्ज घेण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे बँकेची स्थिती भक्कम होण्यास अडचण नाही.
– आ. मानसिंगराव नाईक, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक

Back to top button