आटपाडीतील व्यापार्‍याची तीन कोटींची लूट? | पुढारी

आटपाडीतील व्यापार्‍याची तीन कोटींची लूट?

आटपाडी : पुढारी वृत्तसेवा आटपाडी तालुक्यातील एका गलाई व्यावसायिकाला तब्बल तीन कोटी रुपयांना लुटल्याची बातमी आटपाडी तालुक्यात पसरली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी कर्नाटक पोलिसांचे एक पथक या भागात दाखल झाल्याचे समजते; पण आटपाडी पोलिसांनी याला दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे स्थानिक पोलिसांना याची खबरबात आहे की नाही, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत चर्चेतून कानावर येत असलेली अधिक माहिती अशी की, आटपाडी तालुक्यातील एका व्यापार्‍याचा कर्नाटकमध्ये मोठा गलाई व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी त्याने कर्नाटकात ठिकठिकाणी तीन कोटी रुपयांच्या सोन्याची विक्री केली होती. तीन कोटी रुपयांची ही रक्कम घेऊन हा गलाई बांधव आपल्या कारने बेंगलोरला चालला होता. आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागातील एका गावातील टोळीने या गलाई बांधवाला कर्नाटकातील मंड्या येथे गाठले.

त्याची कार अडवून तीन कोटींची रक्कम लंपास केली. या गलाई व्यवसायिकाच्या हालचालीवर पाळत ठेऊन ही लूट झाली असल्याचे समजते. या संदर्भात संबंधित व्यवसायिकाने कर्नाटक पोलिसात तक्रार दिल्याचीही चर्चा आहे. यासंदर्भात कर्नाटक पोलिसांची टीम आटपाडी तालुक्यात तपास करण्यासाठी दाखल झाल्याचे समजते. मात्र याबाबत आटपाडी पोलिसांना काही माहिती नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. कांहीवेळा कर्नाटक पोलीस स्थानिक पोलिसांना अंधारात ठेऊन तपास करत असल्याने स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती नसावी.

दरम्यान या लुटीच्या माहितीमुळे आटपाडी तालुक्यातील गलाई बांधवांच्यात खळबळ उडाली आहे. कारण गलाई व्यवसायाच्या निमित्ताने या भागातील व्यवसायिक भारतभर कार्यरत आहेत. त्यांच्याही बाबतीत अशी घटना घडण्याची भिती त्यांच्यातून व्यक्त करण्यात येत आहे.
स्थानिकांचा सहभाग : तपासासाठी कर्नाटक पोलिस आटपाडीत दाखल झाल्याची चर्चा

Back to top button