सांगली :  राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी : रामदास आठवले | पुढारी

सांगली :  राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी : रामदास आठवले

सांगली : पुढारी वृत्तसेवा घटनेमध्ये सर्वांना समान स्वातंत्र्य असताना राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात उत्तरभारतीयांना विरोध केलेला आहे. त्यामुळे त्यांनी अयोध्येत जाण्यापूर्वी सर्व उत्तरभारतीयांची माफी मागावी, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

मंत्री आठवले सांगलीत एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज ठाकरे यांनी मशिदीवरील अजानचा मुद्दा उपस्थित करून राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, महाराष्ट्रातील जनतेने त्यांना साफ नाकारले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पोलिस व रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे सर्वत्र शांतता होती. महाराष्ट्र पेटेल म्हणणार्‍यांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे.

मंत्री आठवले पुढे म्हणाले, छत्रपतींचा इतिहास पाहिला तर राज्याभिषेकावेळी महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाने त्यांना विरोध केला होता. अशावेळी उत्तर भारतातले गागा भट्ट यांना बोलावण्यात आले होते. हा इतिहास राज ठाकरे यांनी विसरू नये. त्यामुळे उत्तरभारतीयांचे महाराष्ट्रावर उपकार आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी अयोध्येत जाण्यापूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागावी.

राजर्षी शाहू राजांची स्मृती शताब्दी कार्यक्रम

मंत्री आठवले म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची स्मृती शताब्दी वर्ष सध्या साजरे होत आहे. यानिमित्ताने रिपाइंच्यावतीने 8 व 9 ऑक्टोबररोजी कोल्हापुरात भव्य कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यामध्ये चर्चासत्र, कुस्ती मैदान, क्रिकेटच्या मॅचेस, दांडपट्टा आदी खेळांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

Back to top button