द. भा. जैन सभा अधिवेशन; सांगलीत शोभायात्रा | पुढारी

द. भा. जैन सभा अधिवेशन; सांगलीत शोभायात्रा

सांगली ; पुढारी वृत्तसेवा : ‘जय बोलो, जय बोलो’ ‘जैन धर्म की जय बोलो’ च्या जयघोषात दक्षिण भारत जैन सभेच्या शंभराव्या अधिवेशनाला भव्य शोभायात्रेने सुरुवात करण्यात आली. आज अधिवेशाने उद्घाटन आणि विविध संघटनेचे अधिवेशन पार पडणार आहे. दिगंबर जैन बोर्डिंग ते नेमीनाथनगर पर्यंत काढण्यात आलेल्या शोभायात्रेत झांजपथक, ढोलताशे, पारंपरिक वेशभूषेतील श्रावक-श्राविका सहभागी झाले होते.

केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, सभेचे कार्याध्यक्ष सुरेश पाटील व स्वरूपाताई राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पंचरंगी ध्वज दाखवून शोभायात्रेची सुरुवात केली. यावेळी रावसाहेब पाटील (दादा), रावसाहेब जि. पाटील, खजिनदार सागर वडगावे, सुरेश जी. पाटील, शशिकांत राजोबा, अनिल जैन (शेगुणशे), डॉ. अजित पाटील, स्वाभिमनी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा, सुदर्शन हेरले, प्रशांत अवधूत, प्रा. एन. डी. बिरनाळे, सचिन पाटील, डॉ. आण्णासाहेब चोपडे, राजेंद्र झेले, दादा पाटील-चिंचवाडकर, अभय पाटील, अविनाश पाटील, जयपाल चिंचवाडे, सभा व शाखांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

सांगली जैन बोर्डिंगपासून जैन धर्माच्या जयघोषात आणि ढोल, ताशांच्या गजरात निघालेली शोभायात्रा काँग्रेस भवन, राममंदिर चौक, पुष्पराज चौक, मार्केट यार्डमार्गे नेमीनाथनगर येथील नमस्कार क्रीडांगणावर शोभायात्रेची सांगता करण्यात आली.

शोभायात्रेत सहभागी झालेले कर्नाटकतील शिमोगा येथील कथानृत्य, स्नेहज्योत महिला ढोलपथक, दुधगाव येथील नऊवारी वेशभूषेतील वीर महिला मंडळ, दुधगावचे लेझीम पथक, राजमती महिला मंडळ, वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे विद्यामंदिरचे लेझीम पथक, श्रीमंती अण्णासाहेब पाटील हायस्कूलच्या विद्यार्थिनींचे लेझीम पथक, वीर सेवा दल शाखा कसबे डिग्रज यांचे झांजपथक, इंगळी येथील वीर सेवा दलाचे झांजपथक, चिंचवाड हायस्कूलनेने साकारलेले छत्रपती शाहू महाराज, दि. ब. अण्णासाहेब लठ्ठे आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जीवनपट साकारलेल्या चित्ररथाने उपस्थितांचे लक्ष वेेधून घेतले होते.शोभायात्रेत दक्षिण भारत जैन सभेच्या दिवंगत कर्तबगार 34 नेत्यांचा जीवनपट चित्ररथ, स्त्री शिक्षणरथ, वीराचार्य आयटीआयचा मॉडेलचा चित्ररथ, राष्ट्रीय एकता चित्ररथ, पारंपरिक वेशभूषा पथक सहभागी झाले होते. राजमती योगा केंद्राच्या मोहन व अर्चना कवठेकर, शैलेश कदम व विनायक रामदुर्ग यांच्या योग प्रात्यक्षिकांनी शोभायात्रेची शोभा वाढविली. यावेळी शोभायात्रेत हजारहून अधिक श्रावक-श्राविका उपस्थित झाले होते.

रविवारी अधिवेशनाचा मुख्य दिवस

रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जैन समाजाशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री जयंत पाटील, मंत्री एकनाथ शिंदे, हसन मुश्रीफ, आदित्य ठाकरे, राज्यमंत्री विश्वजित कदम, सतेज पाटील, कर्नाटकचे मंत्री शशिकला जोल्ले, उमेश कत्ती उपस्थित राहणार आहेत.

आज सभेचे उद्घाटन

अधिवेशनात आज अधिवेशनाचे उद्घाटन, नवीन अध्यक्ष पदग्रहण, जैन महिला परिषद, वीर महिला मंडळ, वीर सेवा दलाचे, पदवीधर संघटनेचे त्रैवार्षिक अधिवेशन पार पडणार आहे. यावेळी नवीन पदाधिकारी, संघटनेची रूपरेषा, संघटनेची धोरणे इत्यादी विषयांवर ठराव होणार आहेत.

Back to top button