सांगलीत अपहरण करून एकास लुटले | पुढारी

सांगलीत अपहरण करून एकास लुटले

सांगली : पुढारी वृत्तसेवा लिफ्ट देण्याच्या बहाण्याने शिरगाव (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील शंकर तुकाराम व्हरकट (वय 40) यांचे मोटारीतून अपहरण करण्यात आले. तानंग फाट्यावर नेऊन लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून त्यांच्याकडील 27 हजार रुपयांची रोकड लुटण्यात आली.

शनिवारी रात्री साडेआठ ते साडेबारा या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी दोन अज्ञात लुटारूविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शंकर व्हरकट हे कामानिमित्त सांगलीत आले होते. काम आटोपल्यानंतर ते साडेआठ वाजता शिवाजी मंडईमार्गे मुख्य बसस्थानकाकडे निघाले होते. त्यावेळी पाठीमागून लाल रंगाची मोटार आली. यामध्ये दोन संशयित होते. त्यांनी व्हरकट यांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मोटारीत बसविले. तेथून ते भरधाव वेगाने निघून गेले.

व्हरकट यांना संशय आल्याने त्यांनी मोटार थांबविण्यास सांगितले. त्यावेळी संशयितांनी व्हरकट यांना शिवीगाळ करून लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली. जिवे मारण्याची धमकीही दिली. तोंडावर, उजव्या गालावर, हातावर, पाठीत, डोक्यात रॉडने मारहाण केली. यामध्ये त्यांचे गालाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. संशयितांनी त्यांना तानंग फाट्यावर नेले. तिथे मोटार थांबवून पुन्हा मारहाण केली. त्यांच्या बॅगेतील 27 हजार रुपयांची रोकड घेऊन ते साडेबारा वाजता पसार झाले. स्थानिक लोकांनी व्हरकट यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले.

शहर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी व्हरकट यांचा जबाब घेऊन गुन्हा दाखल केला. शिवाजी मंडईजवळ खाद्यपदार्थ विक्रीचे गाडे थांबतात. विक्रेत्यांनी व्हरकट यांचे अपहरण झाल्याचा प्रकार पाहिला आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेजही तपासले जात आहे.

तानंग फाट्यावर जाईपर्यंत जिथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्याचे फुटेज ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. कॅमेर्‍यामध्ये लाल रंगाची मोटार दिसते का, याची चाचपणी केली जात आहे. संशयित हे स्थानिक असावेत, असा संशय आहे. लवकरच त्यांना पकडण्यात यश येईल, असे पोलिसांनी सांगितले.

Back to top button