कुपवाड येथे केमिकल लिक्वीड बॅरेलचा स्फोट; कामगार ठार | पुढारी

कुपवाड येथे केमिकल लिक्वीड बॅरेलचा स्फोट; कामगार ठार

कुपवाड : पुढारी वृत्तसेवा 

कुपवाड एमआयडीसीतील सुयश कास्टिंग प्रा.लि. या कंपनीतील कामगार राहुल बाजीराव नंदीवाले (वय 25 रा. सुभाषनगर, मिरज)हा केमिकल लिक्वीड बॅरेलचा पत्रा कापताना झालेल्या बॅरेलच्या स्फोटात 90 टक्के भाजला होता. मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद कुपवाड पोलिस ठाण्यात झाली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी : मयत राहुल नंदीवाले हा काही महिन्यांपासून कुपवाड एमआयडीसीतील सुयश कास्टिंग प्रा.लि. या कंपनीत सकाळ सत्रात काम करीत होता. बुधवारी, दि.4 मे रोजी दुपारी तो केमिकल लिक्वीड भरलेला पत्र्याचा बॅरेल कापत होता. दरम्यान, बॅरेलचा स्फोट झाला. या स्फोटात राहुल हा 90 टक्के भाजला होता. कंपनीतील इन्चार्ज निखिल सुतार यांनी जखमी अवस्थेत त्याला मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती कुपवाड पोलिसांना मिळताच त्यांनी कंपनीत जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केला.

Back to top button