राज्यात वाढतोय ठिबक सिंचनचा टक्का ! | पुढारी

राज्यात वाढतोय ठिबक सिंचनचा टक्का !

सांगली : विवेक दाभोळे राज्यातील 13 लाख 66 हजार 125 हेक्टर शेती क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आले आहे. ‘ठिबक’खालील टक्का वाढत आहे. मात्र, शेतकर्‍यांवर या योजनेच्या अनुदानासाठी मात्र सातत्याने उपेक्षित राहण्याची वेळ कायमच राहते आहे. ‘स्प्रिंक्लर’मध्ये मात्र विदर्भाची आघाडी राहिली आहे.

राज्यात एकूण 25 लाख 72 हजार हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आले आहे. आता महाविकास आघाडी सरकारने ‘ठिबक’ आणि ‘तुषार’साठीच्या अनुदानासाठी भरीव रकमेची तरतूद केली आहे. चालू वर्षाकरिता 589 कोटी रक्कम शासनाने यासाठी मंजूर केली आहे. मात्र, हे अनुदान लाभार्थी शेतकर्‍यांना नियमित मिळणे गरजेचे आहे, तरच याचा खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांना लाभ होणार आहे.

राज्यात 13 लाख 66 हजार हेक्टर क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आले आहे. यात सर्वाधिक म्हणजे 3 लाख 76 हजार 943 हेक्टर क्षेत्र कापूस पिकाखाली आहे. हे क्षेत्र राज्याच्या एकूणपैकी 27.59 टक्के इतके आहे. सर्वाधिक चर्चा होत असलेल्या ऊस पिकासाठीदेखील ठिबकचा वापर करण्यासाठी शेतकर्‍यांचा कल वाढू लागला आहे. राज्यात 2 लाख 25 हजार 789 हेक्टर उसाचे क्षेत्र ठिबकखाली आहे. राज्याच्या क्षेत्रापैकी हे क्षेत्र 16.48 टक्के आहे. याचप्रमाणे राज्यात 1 लाख 24 हजार 443 हेक्टर डाळिंब आणि केळी पिकासाठी 1 लाख 49 हजार 381 हेक्टर तसेच 1 लाख 89 हजार 522 हेक्टर द्राक्षाचे क्षेत्र ठिबकखाली आले आहे.

ठिबक सिंचनखालीदेखील क्षेत्र वाढत गेले आहे. सन 2009-10 मध्ये राज्यात 91 हजार 58 ठिबक सिंचनचे संच कार्यरत होते. यातून 81 हजार 660 हेक्टर क्षेत्र भिजले होते. सन 2010-2011 मध्ये 1 लाख 40 हजार 764 ठिबकचे संच होते, तर 1 लाख 27 हजार 967 हेक्टर क्षेत्र ठिबकखाली आले होते. सन 2014-2015 मध्ये तर ठिबकचे तब्बल 2 लाख 496 संच कार्यरत झाले होते, तर यातून 1 लाख 70 हजार 719 हेक्टर क्षेत्रातील पिके ठिबकखाली आली होती. आजच्या घडीला म्हणजे 2022 मार्चअखेर राज्यात ठिबक सिंचनाखालील क्षेत्रात प्रचंड वाढ झाली आहे. तब्बल 13 लाख 66 हजार हेक्टर क्षेत्र बागायती झाले आहे. ठिबकमध्ये राज्यात पश्चिम महाराष्ट्राचीच आघाडी आहे. पश्चिम महाराष्ट्रात तब्बल 8 लाख 52 हजार 297 हेक्टर ठिबकखाली आहे.

राज्यात 2009-2010 मध्ये स्प्रिंक्लरचे 36 हजार 329 संच होते. यातून 37 हजार 552 हेक्टर पिके सिंचनाखाली होती. सन 2010-11 मध्ये 38 हजार 30 संच झाले होते, तर 38 हजार 29 हेक्टर बागायती झाले होते. सन 2014- 2015 मध्ये स्प्रिंक्लरचे संच होते 52 हजार 180, तर यातून 43 हजार 98 हेक्टर पाण्याखाली आले होते. तुषार सिंचनखाली राज्यात 5 लाख 21 हजार 38 हेक्टर क्षेत्र बागायती आहे. यात मात्र विदर्भाची आघाडी आहे. विदर्भात 2 लाख 85 हजार 110 हेक्टर क्षेत्र तुषार सिंचनखाली आहे. विभागनिहाय ठिबक आणि तुषार सिंचनखालील जिल्हानिहाय क्षेत्राची आकडेवारी सोबतच्या चौकटीत दिली आहे.

जिल्हानिहाय ठिबक सिंचन क्षेत्र हेक्टरमध्ये

सोलापूर : 1 लाख 46 हजार 765
अहमदनगर : 86 हजार 230
पुणे : 68 हजार 141
सांगली : 60 हजार 822
सातारा : 24 हजार 945
कोल्हापूर : 11 हजार 949

Back to top button