नागेवाडी साखर कारखान्याची थकीत ऊस बिले १५ टक्के व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार | पुढारी

नागेवाडी साखर कारखान्याची थकीत ऊस बिले १५ टक्के व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार

विटा ; पुढारी वृत्तसेवा : नागेवाडी साखर कारखान्याची थकीत ऊस बिले १५ टक्के व्याजासह येत्या सोमवारी, ३० एप्रिल रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर तासगाव कारखान्याची ही बिले पुढच्या चार दिवसात जमा होतील अशी माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली आहे.

गेल्या वर्षभरापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने खासदार संजय पाटील यांच्या नागेवाडी आणि तासगाव साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांनी घातलेल्या ऊसाच्या थकीत बिलासाठी विविध आंदोलने करण्यात आली. अखेरीस या आंदोलनाना यश आल्याचा दावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केला आहे.

ते म्हणाले, नागेवाडी साखर कारखान्याची थकीत बिले ही येत्या सोमवारी ३० एप्रिल रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे ही बिले १५ टक्के व्याजासह जमा करण्यात येणार आहेत. ही रक्कम एकूण सहा कोटी रुपये असून त्यामुळे आमच्या आंदोलनाचे हे यश आहे. तासगाव आणि नागेवाडी कारखान्याची थकीत ऊस बिले मिळावीत यासाठी गेल्या वर्षीच्या १६ एप्रिल पासून स्वाभिमानीच्यावतीने आंदोलन सुरू आहे.

आतापर्यंत ३५ कोटीची ऊस बिले शेतकऱ्यांना मिळवून दिली आहेत. यासाठी सात ते आठ आंदोलने करण्यात आली. कधी अर्धनग्न आंदोलन, महिला मुंडण, भीक मांगो, बेमुदत ठिय्या, मोर्चे काढून सतत आंदोलनाची धग कायम ठेवली होती त्यामुळे साखर आयुक्तांनी आर आर सीची कारवाई करण्याचे आदेश सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.

नागेवाडी साखर कारखान्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

जिल्हाधिकाऱ्यांकडून ते आदेश तासगाव आणि विटा येथील तहसीलदारांना देवून साखर आणि मालमत्ता विक्री ची प्रक्रिया करण्यास सांगितले. तासगाव साखर लिलावास प्रतिसाद मिळाला नाही. मात्र नागेवाडी कारखान्याच्या ४९ हजार क्विंटल पोत्याचा लिलाव ४ मार्च रोजी झाला त्यातून १५ कोटी ७० लाख रुपये विट्याच्या तहसीलदारांच्याकडे परवा २४ एप्रिल रोजी जमा झालेले आहेत.

त्यानंतर पूर्ण रक्कम जमा होणे आणि राज्य शासनाच्या लेखा परीक्षण विभागाकडून शेतकऱ्याच्या याद्या अंतिम झाल्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग केले जातात. त्यानुसार साखर लिलावाची पूर्ण रक्कम जमा झाली आहे अंतिम याद्या आज बुधवारी पूर्ण होवून तहसीलदारांना सादर करण्यात आल्या आहेत.

त्यामुळे उद्या गुरुवार, शुक्रवार रोजी खातरजमा तसेच इतर शासकीय प्रक्रिया पूर्ण करून येत्या सोमवारी ३० एप्रिल रोजी नागेवाडी कारखान्याची राहिलेली ऊस बिले १५ टक्के व्याजसहित शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत. ही रक्कम वर्ग केल्यानंतर उर्वरित सुमारे ९ कोटी इतकी रक्कम तासगावच्या तहसीलदारांच्या कडे वर्ग केली जाणार आहे.

राज्य शासनाच्या लेखा परीक्षण विभागाकडून शेतकऱ्याच्या नावाच्या याद्या अंतिम होवून आल्या की चार दिवसात तासगाव कारखान्याची ऊस बिले शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केली जातील असेही खराडे यांनी सांगितले आहे.

Back to top button