सांगली : ‘मिरज पश्चिम’ बनला अवैध व्यावसायिकांचा अड्डा | पुढारी

सांगली : ‘मिरज पश्चिम’ बनला अवैध व्यावसायिकांचा अड्डा

सांगली; पुढारी वृत्तेसा : मिरज तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये मटका, जुगार अगदी बेधडकपणे सुरू आहे. हॉटेल, धाब्यांवर राजरोसपणे देशी, हुबळी मेड आणि बनावट दारूची विक्री राजरोसपणे सुरू आहे. हा भाग अवैध व्यावसायिकांचा अड्डाच बनला आहे. पोलिसांकडून मात्र कारवाई होत नाही. परिणामी या भागात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

वारणा आणि कृष्णाकाठच्या या सधन भागात काही महिन्यांपासून चौका-चौकात, गल्लीबोळात खुलेआमपणे मटका, जुगाराचा खेळ सुरू झाला आहे. यातून मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. यामध्ये युवकवर्ग मोठ्या प्रमाणात गुंतला आहे.

या परिसरात देशी, हुबळी मेड, बनावट दारू विक्री करणार्‍यांची संख्याही वाढती आहे. यंत्रणेच्या कृपाआशीर्वादाने गावागावांत, हॉटेल, धाब्यावर अवैधरीत्या खुलेआम दारू विकली जात आहे. कोल्हापूरमधून आणि कर्नाटकमधून आयात करून या भागात गांजा विक्री केली जात आहे. बेधडकपणे सुरू असणार्‍या या व्यवसायाची पोलिसांना माहिती नसेल का, असा सवाल उपस्थित होत आहे. ‘तेरी भी चुप मेरी भी चुप’ या उक्तीप्रमाणे सर्व उद्योग बिनबोभाट सुरू आहे. या भागात उजळ माथ्याने फिरणारे व्हाईट कॉलरमधील काहीजण या व्यावसायिकांचे पोशिंदा असल्याचे बोलले जाते. काहीजण यंत्रणेचे दलाल म्हणून भागात वावरत आहेत. त्यांच्यामार्फत यंत्रणा मॅनेज केली जात असल्याची चर्चा आहे.

वारणा नदीच्या पात्रातून रात्रीच्यावेळी वाळू काढली जात आहे. उपशास परवानगी नसताना वाळू उपसा सुरू असल्यानेे आश्चर्य व्यक्त होत आहे.

व्यसनाधिनतेच्या नादी लागून आजपर्यंत अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अनेकांनी घरे, शेती विकली आहे. सांगली ग्रामीण पोलिसांनी अवैध व्यवसाय मोडीत काढण्यासाठी मोहीम राबविण्याची या सार्‍या भागातून मागणी होत आहे.

Back to top button