आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : माडगुळे (ता. आटपाडी) येथील खंडोबा मळा येथे दुर्मीळ जातीचा व विषारी पोवळा साप आढळला. श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाचे प्राणीशास्त्र विभागप्रमुख व सर्पतज्ज्ञ प्रा. डॉ. शिवाजी विभुते यांना हा साप आढळला. या सापाचे इंग्रजी नाव स्लेंडर कोरल स्नेक आहे. याचे शास्त्रीय नाव कॅलोफिस मेल्यान्युरस आहे. हा साप एकदम निमुळता आहे. तो 22 इंचापर्यंत लांब वाढतो. सापाचा रंग मातकट असून डोके काळे व डोक्यावर पांढरे ठिपके आहेत. शेपटीला दोन काळ्या रंगाच्या रिंगा आहेत. पोटाकडील बाजूस लालसर व शेपटीखाली निळसर राखाडी रंग आहे. या सापाला डिवचल्यास तो लक्ष डोक्याकडून विचलित करण्यासाठी शेपटीच विटोळे घालतो. या जातीच्या सापाची नोंद गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, गोवा, पश्चिम बंगाल या राज्यात आणि बांगलादेश व श्रीलंका या देशात झालेली आहे. हा साप विषारी आहे. याचे विष मज्जासंस्थेवर परिणाम करते. प्रा.डॉ. विभुते यांनी या सापाला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले.