सांगली : जिल्हा बनू लागला विदेशी भाजीपाला ‘हब’ | पुढारी

सांगली : जिल्हा बनू लागला विदेशी भाजीपाला ‘हब’

सांगली : विवेक दाभोळे

विदेशी भाजीपाला शहरी भागात आता सर्रास उपलब्ध होत आहे. दराची हमी, तुलनेने उत्पादन खर्च कमी, पुण्या-मुंबईसह हैद्राबाद येथे पंचतारांकित हॉटेल्समध्ये मागणीतील सातत्य यामुळे प्रयोगशील शेतकरी विदेशी भाजीपिकांकडे वळू लागला आहे.
प्रामुख्याने वाळवा तालुक्यातील शिगाव, बागणी येथे विदेशी भाजीपाला पिकवला जाऊ लागला आहे. जत, खानापूर तालुक्यांबरोबरच शिराळा तालुक्यात अनेक शेतकरी विदेशी भाजी पिकांची अगदी शास्त्रोक्त शेती करत आहेत.

काही वर्षांपूर्वीपर्यंत एखाद्या मोठ्या मॉलमध्ये ब्रोकोली, झुकेनी पहायला मिळत होती. मात्र हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश राहूदे; अगदी वारणाकाठच्या शिगाव, बागणी आणि घाटमाथ्यावर देखील शेतकरी झुकेली, ब्रोकोली, लेट्यूस, ब्रुसेल्स स्प्राऊट, अ‍ॅस्पॅरॅगस आदी विदेशी भाजीपिके घेत आहेत.

हुकमी ऊसपट्टा असलेल्या वारणा टापूत, युवा प्रयोगशील शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत. शिगाव, बागणी येथे काही प्रयोगशील युवा शेतकर्‍यांनी विदेशी भाजीपाला शेतीची लागवड आणि विक्रीदेखील यशस्वी केली आहे. झुकेनी, ब्रोकोली, चेरी टोमॅटो, बेसील, रेड कॅबेज, पॉपचाई, रेड कॅबेज आदींची या भागात लागवड केली जाते. सर्वाधिक पसंती झुकेनीस राहते. गेल्या हंगामात 35 रु. दर किलोसाठी राहिला होता. ब्रोकोली, रेड कॅबेजची रोपे लावावी लागतात. चेरी टोमॅटो, बेसीलची लागवड फायद्याची ठरत आहे. बेसील ही औषधी असल्यामुळे फारसा औषधांचा खर्च येत नाही.

मागणीत होतेय वाढच..!

विदेशी भाजीपाल्यासाठी जाणकार, प्रामुख्याने आरोग्यासाठी जागृत असलेल्या लोकांमधून वाढती मागणी येत आहे. रोजच कोबी खाऊन कंटाळलेली शहरी व्यक्ती आता सहजच ‘ब्रोकोली’ नाहीतर झुकेनी बाजारात मिळते का हे पाहत असल्याचे चित्र आता नवीन नाही. महत्त्वाचे म्हणजे जिल्ह्यातील हवामान हे विदेशी भाजीपाला उत्पादनासाठी पोषक ठरत आहे. विदेशी भाजीपाल्यावर रोग, किडींचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचा शेतकर्‍यांचा अनुभव आहे. यामुळे औषध फवारणीचा खर्च नाही, बाजारभावात नक्कीच फायदा याचे गणित जमत असल्याने उत्पादक सांगतात. प्रामुख्याने पुणे, मुंबई वाशी मार्केट येथे जिल्ह्यातील विदेशी भाजीपाला पाठविला जातो.
झुकेनी, रेड कॅबेज, ब्रोकोली, स्नो पीस, आईस बर्ग, रॉकेट, लेमन ग्रास, बेबी कॉर्न. झुकेनी ही काकडीसारखी वेलवर्गीय फळभाजी आहे. ब्रोकील ही फ्लॉवरसारखी हिरव्या रंगाची भाजी आहे. बेसीलची मागणी कायम राहणार हे नक्की. रेड कॅबेज ही भाजी तांबूस असते. पॉपचॉई ही भाजी कोबीसारखीच असते. तिची पाने, कंद भाजीसाठी वापरतात.

विदेशी भाजीपाला लागवडीत प्रयोगशीलतेला वाव आहे. हैदराबाद, पुणे, मुंबई येथील व्यापार्‍यांकडून ऑर्डर आल्यानंतर माल काढून त्याचे पॅकिंग करून पाठवावा लागतो. शेतकर्‍यांनी विशेषत: तरुण शेतकर्‍यांनी शेतीत वेगळे काही करायचे असेल तर अशा वेगळ्या वाटा धुंडाळण्याची गरज आहे. विदेशी भाजीपाला शेतीत मोठी संधी आहे.

विदेशी भाजीपाला लागवडीत प्रयोगशीलतेला वाव आहे. हैदराबाद, पुणे, मुंबई येथील व्यापार्‍यांकडून ऑर्डर आल्यानंतर माल काढून त्याचे पॅकिंग करून पाठवावा लागतो. शेतकर्‍यांनी विशेषत: तरुण शेतकर्‍यांनी शेतीत वेगळे काही करायचे असेल तर अशा वेगळ्या वाटा धुंडाळण्याची गरज आहे. विदेशी भाजीपाला शेतीत मोठी संधी आहे.
– कौस्तुभ बारवडे, विदेशी भाजीपाला उत्पादक, शिगाव

पोषक आहार.. ..!
आपल्या रोजच्या आहारात भाजीपाल्याचे महत्त्व वाढू लागले आहे. भाजीपाल्याची रोजच्या आहारात होत असलेली वाढती मागणी, लोकांचे बदलते राहणीमान यामुळे विदेशी भाजीपाला शेतीला चांगला वाव आहे. महत्त्वाचे म्हणजे विदेशी भाजीपाला पिकांचे एकरी उत्पादन जास्त निघते. पीक लवकर काढणीस येते. जोडीला मागणीदेखील चांगली राहत आहे. यात चांगला फायदा होऊ शकतो.
– आनंदराव शामराव शेटे, विदेशी भाजीपाला उत्पादक शेतकरी, बागणी

Back to top button