सांगली : जिल्ह्यात ‘टँकर मुक्ती’ला ब्रेक | पुढारी

सांगली : जिल्ह्यात ‘टँकर मुक्ती’ला ब्रेक

सांगली : संजय खंबाळे

जिल्ह्यात गेले दोन वर्षे असणार्‍या टँकर मुक्तीला यंदा मात्र ब्रेक लागणार आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने विहिरी, कूपनलिकेतील पाणी पातळी घटू लागली आहे. काही भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. जत, कवठेमहांकाळ तालुक्यासह अनेक भागातून टँकरची मागणी होऊ लागली आहे. येत्या काही दिवसांत जिल्ह्यात पाणी संकट येण्याची भीती व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात गेले दोन वर्षे मुसळधार पाऊस पडला. कृष्णा, वारणा, नद्यांना महापूर आला. तरीही एप्रिलच्या दुसर्‍याच आठवड्यात जिल्ह्यातील अनेक वाड्या-वस्त्यांवर पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे.

गेल्या वर्षी जिल्ह्यातील दहा तालुक्यात 7 हजार 429 मिलिमीटर असा रेकॉड ब्रेक पाऊस झाला. परिणामी जिल्ह्यात सर्व तलाव-बंधारे तुडुंब भरले. जिल्ह्यातील भूजल पातळी 0.65 मीटरने वाढली होती. परिणामी एप्रिलच्या सुरुवातीला विहिरी, नद्यांमध्ये समाधानकारक पाणीसाठा होता. मात्र सध्या विहिरी, कूपनलिकेतील पाणी कमी होऊ लागले आहे. त्यामुळे अनेक भागात शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. वाड्या-वस्त्यांवर लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

सोपस्कार पूर्ण होणार कधी?

प्रशासनाकडून सांगण्यात आले की, अद्याप टँकरची मागणी नाही. केवळ जत तालुक्यातील काही गावांतून मागणी आली आहे. त्या ठिकाणच्या संबंधित अधिकार्‍यांना मागणी आलेल्या गावात खरोखर टँकरची गरज आहे का, याची खातरजमा करण्याची सूचना दिल्या आहेत. खात्री पटल्यानंतर टँकर सुरू करण्यात येतील, असे सांगण्यात
आले.

गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात पारा वाढतो आहे. परिणामी विहिरी, कूपनलिकेतील पाणी कमी होत आहे. मध्यम आणि लघू प्रकल्पांतील पाणीसाठ्यातही घट होत आहे. भूगर्भातील पाणी पातळी कमी होत आहे.

त्यामुळे येत्या काही दिवसांत जिल्ह्यात पाणी संकट येण्याची शक्यता आहे. ताकारी, म्हैसाळ, टेंभू, आरफळ या सिंचन योजना आजही ताकदीने चालत नाहीत. याचा फटका बसत आहे. जिल्ह्याला दृष्काळ मुक्तकरण्यासाठी ‘करेक्ट’ नियोजन करण्याची गरज आहे.

जिल्ह्यात 2019 मध्ये बसली होती झळ

जिल्ह्यात 2019 मध्येे दुष्काळाच्या तीव्र झळा नागरिकांबरोबरच जनावरांनाही बसल्या. जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता. त्यावेळी 220 गावातील 4 लाख 23 हजार 938 लोकांना टँकरने पिण्याचे पाणीपुरवठा करण्यात आला होता. गावागावांत दिवस-रात्र टँकरच्या फेर्‍या सुरू होत्या.

साडेतीन कोटींचा पाणीटंचाई आराखडा

जिल्हा परिषदेने 301 गावे आणि 173 वाड्या-वस्स्त्यांचा पाणीटंचाईचा आराखडा तयार केला आहे. यामध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी 2 कोटी 10 लाख, विहिरीचे अधिग्रहण करण्यासाठी 42 लाख 20 हजार, पाणी योजनांच्या वीज बिलासाठी 1 कोटी 1 लाख, नवीन विंधन विहीर घेण्यासाठी 70 हजार, असे तीन कोटी 52 लाख रुपयांचा प्रस्तावित आराखडा तयार केला आहे.

Back to top button