सांगली: अहिल्यादेवी स्मारकाचे ड्रोनद्वारे लोकार्पण | पुढारी

सांगली: अहिल्यादेवी स्मारकाचे ड्रोनद्वारे लोकार्पण

सांगली पुढारी वृत्तसेवा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारक लोकार्पणावरून रविवारी येथे भाजपचे नेते, कार्यकर्ते विरुद्ध पोलिस यांच्यात जोरदार घमासान संघर्ष झाला. सुमारे तीन तास पोलिस आणि कार्यकर्ते समोरासमोर थांबून होते. त्यातून आ. गोपीचंद पडळकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी स्मारकाजवळ जात ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी करून स्मारकाचे लोकार्पण झाल्याचे जाहीर केले. हा ड्रोन आणि तीन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

अहिल्यादेवी स्मारक लोकार्पण कार्यक्रमावरून भाजप व राष्ट्रवादीमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार संघर्ष सुरू होता. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी दि. 2 एप्रिल रोजी लोकार्पण सोहळा घेण्याचे जाहीर केले. त्याला विरोध करीत भाजपचे आ. पडळकर यांनी ज्येष्ठ मेंढपाळाच्या हस्ते लोकार्पण करण्याची घोषणा केली. त्यामुळे राजकीय तणाव निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी या परिसरात संचारबंदीचा आदेश जारी केला. लोकार्पण सोहळ्यावरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी स्मारकाच्या सभोवताली 100 मीटर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. या भागात जाणारे रस्ते बंद करण्यात आले होते. स्मारकाभोवती पत्र्यांची तटबंदी उभारली. तरी सुद्धा लोकार्पण होणारच, असा इशारा आ. पडळकर यांनी दिला होता.

रविवारी दुपारी दोनच्या सुमारास विश्रामबाग येथे भाजपचे कार्यकर्ते जमा होऊ लागले. त्या ठिकाणी आ. पडळकर, आ. सदाभाऊ खोत, भाजप नेते शेखर इनामदार, दीपक शिंदे आदी कार्यकर्ते मिरवणूक काढत संजयनगर परिसरातून वसंतदादा सुतगिरणी जवळ आले. त्या ठिकाणी आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, माजी. नितीन शिंदे, माजी महापौर संगीता खोत, नगरसेवक राजू कुंभार, कल्पना कोळेकर, स्वाती शिंदे, सविता मदने, गितांजली ढोपे-पाटील, महेश सागरे, गौतम पवार आदी मोठ्या संख्याने उपस्थित होते.

माधवनगर- मिरज रस्त्यावर सुतगिरणी येथे बॅरिकेट लावून मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. कार्यकर्ते बॅऱिकेट बाजूला सारत पोलिसांना न जुमानता स्मारकाकडे पळत सुटले. पोलिसांना त्यांना आवरता आले नाही. पुढे चाणक्य चौकात दुपारी दोनपासून मोठ्या प्रमाणात पोलिस अधिकारी, कर्मचारी सज्ज होते. त्यांनी मोठ्या संख्येने आलेल्या कार्यकर्त्यांना अडविले. तेथून पुढे जाण्यास मनाई केली. त्या ठिकाणी भाजप कार्यकर्ते आणि पोलिस अधिकारी, मिरज विभागाचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी पाच लोकांना सोडण्याची विनंती केली. मात्र पोलिसांनी ती फेटाळली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मारला.

काही वेळानंतर आ. पडळकर आणि काही कार्यकर्त्यांनी शेतातून एकाबाजूने हळूच स्मारकाकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र स्मारकाच्या अलिकडे त्यांना अडवण्यात आले. त्याचवेळी दोघा कार्यकर्त्यांनी ड्रोनद्वारे स्मारकावर पुष्पवृष्टी केली. मात्र पोलिसांनी ड्रोनचा माग काढून ड्रोन आणि संबंधित दोघांना ताब्यात घेतले. त्याशिवाय स्मारकाकडे घोषणा देत झेंडा घेऊन पळत निघालेल्या एकास ताब्यात घेतले. त्यानंतर आ. पडळकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी जल्लोष आणि फटाक्यांची आतषबाजी करीत ड्रोनव्दारे लोकार्पण केल्याचा दावा केला.

ड्रोन परत देण्यास, कार्यकर्त्यांना सोडण्यास भाग पाडले

पोलिसांनी ड्रोन जप्त करून तिघा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत आणण्यात आले. ही माहिती आ. पडळकर यांना मिळाल्यानंतर ते, जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी आदी कार्यकर्ते त्या ठिकाणी आले. त्यांनी चर्चा करून ड्रोन परत देण्यास आणि कार्यकर्त्यांना सोडण्यास भाग पाडले.

शनिवारी खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

महापालिकेतर्फे शनिवारी (दि. 2 एप्रिल) राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार यांच्या हस्ते या स्मारकाचे उद्घाटन होणार आहे. त्यावेळी पालकमंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आदी उपस्थित राहणार आहेत. मात्र या कार्यक्रमाला भाजपचा विरोध आहे. त्यावरून गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत या स्मारकाचे लोकार्पण होण्यापूर्वीच रविवार दि. 27 मार्च रोजी भाजपच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी ड्रोनद्वारे या स्मारकाचे लोकार्पण करून टाकले.

बाजार बंद, नागरिकांचे हाल

चाणक्य चौक येथे होणारा आठवडा बाजार बंद ठेवण्यात आला होता. रस्ते बंद ठेवल्याने या परिसरातील नागरिकांचे हाल झाले. बंदमुळे अनेकांना घरातून बाहेरही पडता आले नाही. अनेक वाहनांना परत जावे लागले.

मोर्चात धनगरी वेषभूषा, ढोलवादन, पिवळे झेंडे

मोर्चात धनगरी वेषात अनेकजन सहभागी झाले होते. रस्त्यावरच ढोल आणि कैताळ वाजवत लोकांनी ठेका धारला होता. मोठ्या संख्येने तरुणही सहभागी झाले होते. महाविकास आघाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू होती.

परिसराला छावणीचे स्वरूप, शस्त्रधारी पोलिस

पुण्यश्लोक आहिल्यादेवी स्मारक परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी या शिवाय शेजारच्या जिल्ह्यातील पोलिसही मागविण्यात आले होते. भर उन्हात दिवसभर शस्त्रधारी पोलिस थांबून होते.

Back to top button