इस्लामपुरात रस्ते उंच; इमारती झाल्या खुज्या! | पुढारी

इस्लामपुरात रस्ते उंच; इमारती झाल्या खुज्या!

इस्लामपूर; अशोक शिंदे : शहर परिसरातील काही प्रमुख व उपनगरांतील रस्त्यांची डांबरीकरणाची कामे सध्या सुरू आहेत. या रस्त्यांची कामे करताना खडीकरण, डांबरीकरणाने रस्त्यांची उंची मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. त्यामुळे आजूबाजूची घरे, दुकाने, इमारती खुज्या-कमी उंचीच्या दिसत आहेत.

वास्तविक रस्ते मजबूत, टिकाऊ बनण्यासाठी रस्ते खोदून त्यांची आधीची उंची पूर्ववत ठेवण्याची आवश्यकता आहे. रस्त्यांची आजूबाजूची दुकाने, कार्यालये, घरे रस्त्यांच्या तुलनेत खूपच खाली गेलेली दिसत आहेत. त्याचबरोबर रस्ते व त्यांच्या दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्यादेखील त्या तुलनेत वाढत असल्याने आजूबाजूची बांधकामे मात्र खुजी वाटत आहेत.

त्याचा दुसरा एक दुष्परिणाम म्हणजेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडील इमारतींकडून येणारे पावसाचे पाणी नैसर्गिक उताराने रस्त्यांच्या बाजूच्या असलेल्या नाल्यांकडे जाते. मात्र काही ठिकाणी सध्या जिथे नाले नाहीत किंवा नाल्यांची उंची वाढत असेल तर रस्ते-नाल्यांवरील पाणी आजूबाजूच्या सखल भागाकडे म्हणजेच इमारतींकडे जाण्याची चिन्हे दिसत आहेत.

प्रामुख्याने अशी गंभीर समस्या शहरातील उपनगरांमधील रस्त्यांच्याबाबत जास्त प्रमाणात दिसते आहे. महादेवनगरसह शहरातील अनेक उपनगरातील रस्त्यांची प्रलंबित असणारी कामे आता मार्गी लागत आहे. हे रस्ते तयार करताना पूर्वीच्या रस्त्यावर खडी, क्रश सॅन्ड, डांबरीकरणाने रस्त्यांची उंची 8-10 इंचांनी तर काही ठिकाणी एका फुटाने वाढलेली दिसते आहे.

वास्तविक अशा ठिकाणचे रस्ते पुन्हा खोदून एकामागून एक मुरूमांचे, खडीचे स्तर आणि त्यावर रोड रोलर आणि पुन्हा डांबरीकरण अशी व्यवस्था आवश्यक आहे. त्यामुळे रस्त्यांची उंचीपण फारशी वाढणार नाही, आजूबाजूच्या इमारतींकडे रस्त्याचे पाणी नैसर्गिक उताराने जाणार नाही.

अर्थात रस्त्यांवरील नियोजित, मंजूर खर्च रक्कम व अपेक्षित काम; याची सांगड रस्ते मंजूर रकमेवेळी घालणे गरजेचे आहे. म्हणजे संबंधित कंत्राटदार, नगरपालिका, अधिकारी यांचाही नाईलाज होणार नाही. त्यामुळे यापुढे रस्त्यांची कामे मंजूर करण्यापूर्वी संबंधित रस्त्यांची उंची किती वाढणार आहे आणि त्याचा आजूबाजूच्या इमारतींवर, पाण्याच्या नैसर्गिक उतारावर काय परिणाम होणार, याचाही अभ्यास होणे आवश्यक आहे.

घर की तळघर…?

सध्या मात्र रस्त्यांच्या उंची वाढवून नाल्यांची योग्य व्यवस्था नसलेल्या ठिकाणी पावसाळ्यात नव्या गैरसोयींना निमंत्रण दिले जात आहे. तसेच रस्त्यांची उंची वर्षानुवर्षे वाढत आलेली आहे. यापुढेही ती वाढतच राहिली; तर नागरिकांची सध्याची घरे-दुकाने तळमजल्यासारखी भासतील, अशीही भीती आहे.

इस्लामपुरात सध्या सुरू असलेली बहे, ताकारी, कामेरी, वाघवाडी या रस्त्यांची कामे ही भारतीय रस्ते महामार्गाच्या मानांकनानुसार संकल्पन (डिझाईन) करून कामे करण्यात येत आहेत. त्या-त्या ठिकाणच्या रस्त्यांची परिस्थिती पाहून नियमानुसार कामे सुरू आहेत.
– सुभाष पाटील उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, इस्लामपूर.

Back to top button