

सांगली पुढारी वृत्तसेवा : येथील कॉलेज कॉर्नरसमोर पेट्रोलपंपामागील रस्त्यावर बुधवारी नवीन 7 खोकी गुपचूपपणे आणून ती उभारण्याचे काम सुरू होते. अनधिकृत खोकी उभारण्याचा उद्योग परिसरातील सतर्क नागरिकांनी हाणून पाडला. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने 'बेवारस' 7 खोकी जप्त केली. ही खोकी कोणाची आहेत. कोणी आणून ठेवली याबाबत महापालिकेलाही माहिती मिळू शकली नाही.
कॉलेज कॉर्नरसमोर पेट्रोलपंपाच्या मागील रस्त्यावर बुधवारी सकाळी दोन ट्रकमधून नवीन 7 खोकी आणून ठेवल्याचे परांजपे पार्क हौसिंग सोसायटीमधील रहिवाशांच्या निदर्शनास आले. क्रेनच्या सहाय्याने याठिकाणी रस्त्यावर खोकी उभारली जात होती. एकूण 10 खोकी उभारली जाणार असल्याचे या नागरिकांना समजले. त्यानंतर त्यांनी नगरसेवक, कार्यकर्ते व महापालिकेशी संपर्क साधून रस्त्यावर खोकी उभारली जात असल्याची तक्रार केली.
महापालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक 2 चे सहायक आयुक्त एस. एस. खरात हे संबंधित ठिकाणी अतिक्रमण निर्मूलन पथकासह दाखल झाले आणि 7 खोकी जप्त करून नेली. खोकी जप्त करताना खोक्यांचा 'वाली' फिरकलाही नाही. गुपचूपणे 7 ते 10 खोकी उभारण्याचा उद्योग कोणाचा असावा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सहाय्यक आयुक्त खरात यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, कॉलेज कॉर्नरसमोर पेट्रोलपंपामागील रस्त्यावर अनधिकृतपणे खोकी उभारली जात होती. ही खोकी कोणाची आहेत. कोण उभारत आहे, याबाबत काहीच माहिती मिळू शकली नाही. ही नवीन 7 खोकी जप्त करताना खोक्यांची मालकी सांगण्यासही कोणी पुढे आले नाही. अनधिकृत व रस्त्यावर उभी केलेली खोकी जप्त केली आहेत.
सांगलीत अनधिकृत खोक्यांच्या 'कॅन्सर'ची पुन्हा लागण सुरू झाल्याकडे दैनिक 'पुढारी'ने लक्ष वेधले. महापालिका क्षेत्रात जागोजागी रस्त्यावर अनधिकृत खोकी, स्टॉल, टपर्या दिसू लागल्या आहेत. रस्ते वाहतुकीला अडथळा आणि शहराच्या बकालपणात भर पडत आहे. अशा परिस्थितीत बुधवारी सकाळी कॉलेज कॉर्नरसमोर पेट्रोलपंपामागील रस्त्यावर गुपचूप आणून ठेवलेली 7 खोकी नागरिकांच्या सतर्कतेमुळे जप्त झाली. ही सतर्कता महापालिकेच्या संबंधित यंत्रणेत कधी येणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.