

इस्लामपूर पुढारी वृत्तसेवा : इस्लामपूर शहर व परिसरातील वाढत्या घरफोड्या रोखण्यासाठी प्रभागनिहाय सशस्त्र पोलिस अंमलदारांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकाला तीन बिट मार्शल वाहनेही देण्यात आली आहेत. पोलिस मित्रांच्या मदतीने पोलिसांचे हे पथक पहाटेपर्यंत गस्त घालणार असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
उपअधीक्षक पिंगळे म्हणाले, वाढत्या चोर्या व घरफोड्या रोखण्यासाठी प्रभागनिहाय पोलिस मित्र व 6 सशस्त्र पोलिस अंमलदारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. हे पथक रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत त्या परिसरात गस्त घालणार आहे. त्यांना क्यूआर कोड देण्यात आले आहे. या पथकांनी नेमलेल्या परिसरात गस्त घालून क्यूआर कोड ई पोलिस अॅपद्वारे स्कॅन करण्याच्या सूचना केल्या आहेत.
याशिवाय पोलिस ठाण्याकडील शासकीय वाहनामध्ये दररोज एक अधिकारी नेमून त्यांची संपूर्ण कार्यक्षेत्रात रात्री गस्त केली जाणार आहे. महामार्गावरही पेट्रोलिंग सुरू आहे. महादेवनगर परिसरात सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आलेल्या चोरट्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. त्यातील एक संशयित निष्पन्न झाला आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात येणार्या अनोळखी व्यक्तीवर लक्ष ठेवावे व काही संशय आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा.