सांगली : अहिल्यादेवी स्मारक लोकार्पणवरून राजकारण तापले | पुढारी

सांगली : अहिल्यादेवी स्मारक लोकार्पणवरून राजकारण तापले

सांगली पुढारी वृत्तसेवा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या लोकार्पणावरून राजकारण तापले आहे. लोकार्पणाचा कार्यक्रम महापालिकेचा असताना राष्ट्रवादीने तो स्वत:च्या पक्षाचा केला आहे. त्यामुळे दि. 2 एप्रिलचा कार्यक्रम रद्द करून राज्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत नंतर घ्यावा, अशी मागणी भाजपने केली आहे.

भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शेखर इनामदार व प्रवक्ते मुन्ना कुरणे यांच्या उपस्थितीत सोमवारी भाजपमधील धनगर समाजाचे नेते व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. माजी महापौर संगीता खोत, नगरसेवक संजय यमगर, सविता मदने, अस्मिता सलगर, प्रकाश ढंग, गजानन आलदर तसेच श्रीकांत वाघमोडे, अमर पडळकर, दीपक माने उपस्थित होते.

राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम राष्ट्रवादीने त्यांच्या नेत्यांच्या हस्ते घेण्याचे जाहीर केले आहे. सर्व पक्षांना विश्वासात घेऊन या कार्यक्रमाची तारीख जाहीर करणे आवश्यक होते. मात्र त्याला बगल दिल्याने शुक्रवारी भाजप नेत्यांची बैठक होणार आहे.

खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, संगीता खोत, गीता सुतार तसेच भाजपचे प्रमुख पदाधिकारी व सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याच्या नियोजनाची बैठक होणार आहे.

राज्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा घेण्याचे नियोजन आहे. तोपर्यंत दि. 2 एप्रिलरोजी होणारा स्मारक लोकार्पण सोहळा रद्द करून नंतरची तारीख निश्चित करण्याचा निर्णय घ्यावा’, अशी मागणी आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे केली
आहे.

Back to top button