सांगली : इस्लामपुरात दारूबंदीचा ठराव कागदावरच

सांगली : इस्लामपुरात दारूबंदीचा ठराव कागदावरच

सांगली पुढारी वृत्तसेवा:  इस्लामपूर शहरात दारूबंदी करण्याचा पालिकेचा ठराव कागदावरच राहिला आहे. हा ठराव करून साडेतीन वर्षे लोटली तरीही या ठरावावर अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही.

विकास आघाडीच्या सत्ता काळात सप्टेंबर 2018 मध्ये हा दारूबंदीचा ठराव पालिका सभागृहात मंजूर करण्यात आला होता. इस्लामपूर शहरात दारूबंदी व्हावी, अशी अनेक महिलांची मागणी होती. काही महिला नगरसेवकांनी यासाठी पुढाकार घेतला होता.

तत्कालीन नगरसेविका सुप्रिया पाटील यांनी सभागृहात हा विषय लावून धरल्यामुळे सभागृहाने दारूबंदीचा ठराव मंजूर करून तो उत्पादन शुल्क विभागाकडे पाठविला होता. दारूबंदीची पुढील कार्यवाही उत्पादन शुल्क विभागाने करायची होती. मात्र अद्याप यावर काहीच कार्यवाही झाली नसल्याने हा ठराव कागदावरच राहिला आहे.

शहरात 2 वॉईन शॉप, 17 परमिट रुम, 12 देशी दारू दुकाने, 3 बीअर शॉपी, 1 ताडीचे दुकान असे 35 परवाने आहेत. यातून शासनाला वर्षाला सुमारे 50 लाखांचा महसूल मिळतो. शासन अध्यादेशाप्रमाणे पालिका हद्दीत दारूबंदी करायची असेल तर ती प्रभागनिहाय करावी लागते. त्यासाठी प्रथम त्या प्रभागातील 25 टक्के महिलांनी तसे निवेदन द्यावे लागते. मात्र अशी कोणतीच प्रक्रिया न झाल्याने ही दारूबंदी होवू शकली नाही, असे संबंधित विभागाकडून सांगण्यात येते.

  • उत्पादन शुल्क विभागाकडून कार्यवाही नाही
  • शासनाला मिळतो 50 लाखांचा महसूल

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news