Chandrahar Patil : जवानांसाठी बाराशे शिवसैनिक रक्तदान करणार

पै. चंद्रहार पाटील : ‘श्रीनाथ एक्सप्रेस’ दुसऱ्या वर्षी दिल्लीकडे धावणार
Chandrahar Patil
चंद्रहार पाटील File Photo
Published on
Updated on

​सांगली : भारतीय जवानांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिवसेना क्रीडासेनेच्या वतीने 'सिंदूर आर्मी महारक्तदान यात्रा – वर्ष २' चे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून 'श्रीनाथ एक्सप्रेस' या विशेष रेल्वेद्वारे सांगली जिल्ह्यातील क्रीडासेनेचे १,२०० शिवसैनिक नवी दिल्ली येथील 'आर्मी कमांड हॉस्पिटल'मध्ये जवानांसाठी रक्तदान करणार आहेत, अशी माहिती शिवसेना क्रीडासेना प्रमुख तथा डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी दिली.

रक्तदान शिबिराच्या नियोजनासाठी आयोजित शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, संजय विभुते, बजरंग पाटील, महानगरप्रमुख मोहन वनखंडे, गौरव नायकवडी आणि रावसाहेब खोजगे आदी उपस्थित होते.

पै. चंद्रहार पाटील म्हणाले, भारतीय जवानांसाठी विशेष रेल्वेने प्रवास करून सामूहिक रक्तदान करणारा शिवसेना हा देशातील पहिला आणि एकमेव पक्ष ठरला आहे. ६ ऑगस्ट रोजी सांगली रेल्वे स्थानकावरून 'श्रीनाथ एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा दाखवून या यात्रेचा भव्य शुभारंभ केला जाईल. सांगली येथील शुभारंभ प्रसंगी उद्योगमंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, आमदार सुहास बाबर आणि शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे उपस्थित राहणार आहेत.

नवी दिल्ली येथे पार पडणाऱ्या या महारक्तदान सोहळ्यास केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह पक्षातील खासदार आणि मंत्री उपस्थित राहणार आहेत.

सलग दुसऱ्या वर्षी उपक्रम

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर गतवर्षी 'धर्मवीर एक्सप्रेस'च्या माध्यमातून सैन्यासाठी महारक्तदानाचा पहिला उपक्रम शिवसेना व सांगली जिल्ह्याच्या वतीने यशस्वीपणे राबवण्यात आला होता. जम्मू, श्रीनगर आणि उधमपूर येथील सैनिकी रुग्णालयांत जवानांसाठी रक्तदान करून या अभियानाने देशभरात वेगळी ओळख निर्माण केली होती. यंदा याच राष्ट्रसेवेच्या अभियानाचा पुढील टप्पा देशाची राजधानी नवी दिल्ली येथे पार पडत आहे.

प्रत्येक तरुण सीमेवर जाऊन थेट लढू शकत नसला, तरी रक्ताच्या माध्यमातून आपली देशभक्ती नक्कीच व्यक्त करू शकतो. प्रसंगी भारतीय सैन्यासाठी धावून जाण्यास शिवसेना नेहमीच तत्पर आहे.
- पै. चंद्रहार पाटील, प्रमुख, शिवसेना क्रीडासेना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news