

सांगली : एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागा विकसित करण्याचा शासनाने निर्णय घेतला असून, सांगली जिल्ह्यात अकरा एकर जागा असल्याचा अहवाल शासनाला पाठवला आहे. विशेष म्हणजे ही जागा 25 वर्षांपासून विना वापर पडून आहे.
तोट्यात असलेल्या एसटीला नफ्यात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे पडून असलेल्या वापरण्यायोग्य जमीन भाडेतत्त्वावर ‘बांधा- वापरा आणि हस्तांतर करा’ या योजनेच्या माध्यमातून विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. याबाबत एसटी प्रशासनाकडून प्रस्ताव मागवला आहे. सांगलीच्या एसटी विभागाकडे माधवनगर येथे दहा एकर, तर मिरजेतील मालगाव रोडवरील दिंडी वेस येथे 39 गुंठे जागा उपलब्ध आहे. माधवनगर रोडवरील दहा एकर जागेत मुख्य बसस्थानकाचा प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे. मिरजेतील जागा मात्र विनावापर अनेक वर्षांपासून पडून आहे. याठिकाणी अतिक्रमणेही होत आहेत.
एसटी महामंडळाला तोट्यातून नफ्यात आणण्यासाठी या योजना आखल्या जात आहेत. राज्यभरात विविध ठिकाणी एसटीच्या मालकीच्या जागा आहेत. बीओटी तत्त्वावर या जागा विकसित करण्यात येणार आहे. या जागांचे तीन स्तरावर वर्गीकरण करण्यात येत आहे. यामध्ये शहरी, निमशहरी आणि ग्रामीण शहरी असे वर्गीकरण आहे. सांगली जिल्ह्यातील या दोन्ही जागा शहरी भागात मोडतात.