चार नगरपंचायतींचे नगराध्यपद खुले | पुढारी

चार नगरपंचायतींचे नगराध्यपद खुले

सांगली; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील 139 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण गुरुवारी जाहीर झाले. खुल्या प्रवर्गासाठी 109, अनुसूचित जातीसाठी 17 तर अनुसूचित जमातीसाठी 13 पदे राखीव झाली आहेत. सांगली जिल्ह्यातील कडेगाव, कवठेमहांकाळ, खानापूर व शिराळा नगरपंचायतींचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी (सर्वसाधारण) जाहीर झाले आहे.

नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्या हस्ते मंत्रालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. अनुसूचित जातींसाठी अध्यक्षपदाच्या 17 जागा आरक्षित झाल्या आहेत. त्यातील 9 जागा या अनुसूचित जाती (महिला) तर 8 जागा या अनुसूचित जाती (सर्वसाधारण) साठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती (महिला) राखीव ः लाखणी, कुही, नातेपुते, खंडाळा (जि. सातारा), जळकोट (लातूर), माळेगाव बुद्रूक, पाटण, देहू, वैराग (सोलापूर).

अनुसूचित जाती (सर्वसाधारण) राखीव

म्हाळुंग श्रीपूर, भिसी, केज, देवणी, वाशी, औंढा नागनाथ, संग्रामपूर, लोणंद. अनुसूचित जमाती प्रवर्गात अध्यक्षपदासाठी एकूण 13 जागा राखीव असून त्यातील 7 अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी तर 6 जागा अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) प्रवर्गासाठी सोडतीद्वारे आरक्षित करण्यात आल्या आहेत.

अनुसूचित जमाती (महिला) राखीव

धानोरा, अहेरी, मोहाडी, बाभुळगाव, साक्री, सोयगाव, शहापूर.

अनुसूचित जमाती (सर्वसाधारण)

दिंडोरी, देवरी, गोंडपिंपरी, राळेगाव, भिवापूर,सडक अर्जुनी.

खुल्या प्रवर्गासाठी 109 अध्यक्ष पदे आहेत. त्यातील 55 अध्यक्षपदे महिलांसाठी राखीव झाली आहेत. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियमातील सुधारणेनुसार नगरपंचायतींचे नगराध्यक्ष हे प्रचलित पद्धतीने नगरसेवकांमधूनच निवडले जात असून त्यांचा पदावधी अडीच वर्षे इतका करण्यात आला आहे.

नगराध्यक्षपदाचे आरक्षण निश्चित करताना राज्यातील नगरपंचायतींमध्ये अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येचे राज्यातील नगरपंचायतींमधील एकूण लोकसंख्येशी जे प्रमाण असेल त्यानुसार अध्यक्षांची पदे राखीव ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक प्रवर्गात निम्म्यापेक्षा कमी नाहीत, इतकी पदे महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहेत.

एखादी नगरपंचायत अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी येत असल्यास तेथे ज्या प्रवर्गाच्या लोकसंख्येची टक्केवारी अधिक आहे, अशा प्रवर्गासाठी ती राखीव ठेवण्यात आली आहे.

Back to top button