

मिरज; पुढारी वृत्तसेवा : आरग (ता. मिरज) येथे मध्यरात्री घरात घूसन चाकूच्या धाकाने चार चोरट्यांनी लूटमार करून 47 हजाराचे दागिने लंपास केले. या प्रकरणी नायकू किसन कोरे यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नायकू कोरे हे आरग स्टेशन रस्त्यावरील अहिल्यानगर परिसरात राहण्यास आहेत. रविवारी रात्री ते कुटुंबासमवेत घरी असताना मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास संपूर्ण काळे कपडे, काळी माकड टोपी घातलेले चार चोरट्यांनी कोरे यांच्या घराचा पुढील दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.
त्यानंतर चोरट्यांनी चाकूच्या धाकाने नायकू यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्यांना अंगावरील दागिने काढून देण्यास सांगितले. त्यानंतर 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, दोन अंगठी आणि जोडवी असा 47 हजारांचा मुद्देमाल घेवून चोरट्यांनी पोबारा केला.
याबाबत नायकू कोरे यांनी पोलिसात फिर्याद देताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. परंतु या परिसरातील रस्त्यावर कोठेही सीसीव्ही कॅमेरे नसल्याने चोरटे कोणत्या दिशेला गेले हे समजू शकले नाही. रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. जबरी चोरी प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.