

मिरज : पुढारी वृत्तसेवा शहरातील गणेश तलाव येथे गणेश आगमन मिरवणूक पाहण्यासाठी गेलेल्या मुलास पाच जणांनी लोखंडी रॉड आणि काठीने बेदम मारहाण केली. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या त्याच्या वडिलांना देखील मारहाण करण्यात आली. या प्रकरणी राहुल राजेंद्र भोरे यांनी पोलिसात 5 जणाविरुद्ध फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झालेल्यामध्ये राहुल गोसावी, रोहन गोसावी, अर्जुन गोसावी, राजू गोसावी, रोहित गोसावी (सर्व रा. मिरज) यांचा समावेश आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राहुल भोरे यांचा मुलगा गणेश आगमन पाहण्यासाठी गणेश तलाव येथे गेला होता. त्या ठिकाणी वरील 5 जण थांबले होते. त्यांनी राहुल यांच्या मुलास तू इथे का आला आहेस, असे म्हणून लोखंडी रॉड आणि काठीने बेदम मारहाण केली. यानंतर याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या राहुल भोरे यांना देखील मारहाण करण्यात आली. असे त्यांनी फिर्यादित म्हटले आहे. याबाबत मिरज शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.