

- 200 मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाचा इशारा
- वीस दिवस अडखळलेला मान्सून गुजरातकडे
पुणे : गत वीस दिवस अडखळलेला मान्सून वेगाने सक्रिय झाला. रविवारच्या रात्रीत त्याने अवघा महाराष्ट्र काबीज केला असून, गुजरात राज्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान, मंगळवारी आणि बुधवारी कोकण, मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट दिला. यामुळे पूरस्थिती उद्भवेल. सुमारे 200 मि.मी.पेक्षा जास्त पावसाचा अंदाज कोकणात, तर मध्य महाराष्ट्रात 100 मि.मी. पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
मुंबई, पुणे आणि अहिल्यानगर या भागांत मान्सून यंदा 26 मे रोजी आला. मात्र, तेव्हापासून 15 जूनपर्यंत तो याच भागात अडखळला होता. त्यामुळे पावसाचा जोर फक्त कोकण, मध्य महाराष्ट्र भागात होता. मात्र, रविवारी 15 जूनच्या रात्रीत तो अचानक सक्रिय झाला अन् त्याने मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र अन् विदर्भ काबीज करीत गुजरात राज्यात प्रवेश केला. त्यामुळे पावसाचा जोर वाढला आहे.
पुढील दोन ते तीन दिवसांत नैर्ऋत्य मान्सून उत्तर अरबी समुद्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशा राज्यांत सक्रिय होत आहे. त्यामुळे गुजरातला रेड अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात अतिमुसळधार म्हणजे 200 मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्र, हरियाणा, बिहार, कोकण, जम्मू आणि काश्मीर, छत्तीसगड या राज्यांत काही ठिकाणी ताशी 60 ते 105 किमी वेगाने वादळी वारे वाहत आहे.
-रेड अलर्टः संपूर्ण कोकण, मुंबई, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथा, पुणे घाटमाथा
-ऑरेंज अलर्टः संपूर्ण मध्य महाराष्ट्र
-यलो अलर्ट ः संपूर्ण विदर्भ