

नेरळ : आनंद सकपाळ
कर्जत तालुक्यात सध्या भटक्या श्वानांचा असलेला उद्रेक पाहता, नागरिकांना रस्त्यावरून चालणे असुरक्षित वाटू लागले आहे. भर रस्त्यावर एखादा भटका श्वान नकळत माणसाजवळ येताच त्याच्या हाता पायाला चावा घेत असल्याने नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे.
यामुळे अशा भटक्या श्वानांचा असलेल्या उद्रेकाचा प्रश्न उपस्थित झाला असून, या भटक्या श्वानांचा बंदोबस्त लावणे ही जबाबदारी नेमकी कोणाची असा देखील प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त प्रशासनाकडून लवकरात लवकर लावण्याची मागणी जोर धरत आहे.
कर्जत तालुक्यातील नेरळ शहरात नेरळ ग्रामपंचायत सफाई महिला कर्मचार्याला भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता त्यातच आता येथील दुकानात काम करणार्या कर्मचारी तरुणाला कुत्र्याने चावा घेतल्याने नेरळ शहरात देखील वाढलेल्या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न समोर आला. दरम्यान या भटक्या कुत्र्यांच्या आधी बंदोबस्त करा म्हणून नागरिकांकडून स्थानिक प्रशासनाकडे मागणी लावून धरली. तर कर्जत - कल्याण राज्य मार्गावरील नेरळ परिसरात येत असलेल्या शार्विल स्कूल आणि एल ए ई एस या शाळेच्या परिसरातही एका भटक्या कुत्र्याने येथील कामगार तरुणाच्या हाताला चावा घेतला असल्याची घटना घडली आहे.
दरम्यान हा तरुण आपल्या दुकानाच्या शॉपमध्ये काम करीत असताना जवळ आलेल्या कुत्र्याने अचानक चावा घेतल्याने तरुण घाबरून गेला असून त्याच्या हातातून आलेले रक्ताच्या जमिनीवर धारा लागल्या होत्या. येथील उपस्थित काही तरुणांनी आरडाओरड केल्याने कुत्रा पळून गेला. तर जखमी तरुणाला नेरळ येथे उपचार करून नंतर बदलापूर येथे अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. घडलेल्या घटनास्थळी जर त्यावेळी शाळेतील विद्यार्थी असते तर आज त्याच कुत्र्याने अनेकांना चावा घेत हाताचे पायाचे लचके ओढले असते.
नेरळ शहराच्या प्रत्येक गल्ली बोळात, रस्त्यावर भटक्या कुत्र्यांचा घोळका दिसून येत आहे. रस्त्यावरून चालणार्या नागरिकांवर हे कुत्रे धावून जात असल्याचे प्रकारही समोर येत आहे. नेरळ शहरातील मध्य बाजारपेठ येथे ही भटक्या कुत्र्यांचा प्रश्न हा ऐरणीवर आहे. येथील 7 वर्षीय बालकाचा येथील भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. त्यामुळे पीडिताच्या डोळ्याला जखम झाली होती. दरम्यान ही एक दोन घटना नसून नेरळ शहरातच आतापर्यंत साधारण 30 ते 4े नागरिकांना या भटक्या कुत्र्यांचा अनुभव आलेला आहे. याबाबत नेरळ ग्रामपंचायत प्रशासनाकडेही तक्रार देण्यात आली होती.
मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे याचा परिणाम म्हणून सफाई कर्मचारी महिलेला देखील या भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याचा अनुभव आला आहे. मात्र यावर देखील नेरळ ग्रामपंचायत प्रशासन गप्प असल्याचे चित्र आहे. दरम्यान आता या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा पुढे आला असून, नागरिक भयभीत झालेले आहेत. त्यामुळे आता तरी या कुत्र्यांचा बंदोबस्त लावण्याची मागणी होत आहे.
सध्या रस्त्यावर फिरणारे भटके कुत्रे हे घरातील पाळीव मांजरांना व रस्त्यावर फिरणार्या मांजरांना देखील पकडुन मारत असल्याने त्यांच्या तोंडाला रक्ताची चट लागल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येणार्या काळात कुत्रेच माणसे राहत असलेल्या घरात घुसून माणसाचे लचके तोडू नये म्हणून झाले अशी म्हणण्याची वेळ येते का? असा देखील प्रश्न समोर येत असल्याने, नागरिकांमधून या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त प्रशासना कडून लवकरात लवकर लावण्याची मागणी जोर धरत आहे.