

अलिबाग : सुवर्णा दिवेकर
शाळांमधील अनुचित प्रकार लक्षात घेता शाळांमध्ये सीसीटीव्ही लावणे शासनाने बंधनकारक केले आहे. मात्र रायगड जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये सीसीटीव्हीच नाहीत. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षा अद्याप तरी वार्यावरच आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा परिषदेने या कामासाठी तब्बल 1 कोटी 95 लाख रूपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे.
रायगड जिल्ह्यात 3 हजार 583 खाजगी आणि शासकीय शाळा आहेत. आतापर्यंत 728 शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत. जिल्ह्यात जिल्हा परिषद, सामाजिक संस्था, आदिवासी शाळा, नगरपरिषद आणि महानगर परिषदेच्या 2 हजार 622 शाळा आहेत. यापैकी केवळ 75 शाळा सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आहेत. 2 हजार 547 शाळांवर अद्याप तिसर्या डोळयाची नजर नाही. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने 2025 - 26 या आर्थिक वर्षामध्ये जिल्हयातील शाळा सीसीटीव्हीयुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अर्थसंकल्पात 1 कोटी 95 लाखाची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे आगामी काळात रायगडमधील जिल्हा परिषदेच्या शाळा सीसीटिव्हीच्या निगराणी खाली येणार आहेत.
मुलींची सुरक्षा हा एक गहन विषय होऊ लागला आहे. घर, बाजारपेठ, शाळा याठिकाणीही अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना रोज कुठे ना कुठे घडत आहेत. विद्येचे घर असलेल्या शाळांमध्येही आता मुली सुरक्षित नसल्याचे विदारक चित्र निर्माण होऊ लागले आहे. बदलापूरच्या शाळेतील संतापजनक घटनेनंतर शासनाने शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कडक धोरण अवलंबले आहे. राज्यातील सर्व शाळांना सीसीटीव्ही लावणे बंधनकारक केले आहे.
रायगड जिल्हा परीषदेकडे आपल्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यासाठी निधी उपलब्ध नव्हता. आता जिल्हा परीषदेने या कामी पुढाकार घेत सन 2025 - 26 च्या अर्थसंकल्पात स्वनिधीमधून सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेत तशी तरतूदही केली आहे.
रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद, सामजिक संस्था, नगरपरिषद, महानगर पालिका, तसेच खाजगी संस्थेच्या 3 हजार 583 शाळा आहेत. मात्र यापैकी निम्या शाळेतही विद्यार्थ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना नसल्याचे आकडेवारी वरून स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषद सामाजिक संस्था, आदिवासी शाळा, नगरपरिषद आणि महानगर पालिकेच्या 2 हजार 622 शाळा आहेत. यापैकी 75 शाळांमध्ये सीसीटिव्ही लावले आहेत. तर 2 हजार 547 शाळांमध्ये अजूनही सीसीटीव्ही नाहीत.
जिल्ह्यात 443 अनुदानित शाळा आहेत. या शाळेतील 231 शाळेत सीसीटिव्ही यंत्रणा असून 212 शाळा सीसीटिव्ही वीना सुरू आहेत. जिल्ह्यात 518 विनाअनुदानित शाळा आहेत. यापैकी 422 शाळांमध्ये सीसीटिव्ही यंत्रणा लावलेली असून 96 शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षा राम भरोसे आहे. खाजगी शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा अनेक ठिकाणी कार्यान्वित केलेली असते. मात्र शासकीय शाळांमध्ये ही यंत्रणा नसल्याने काही अघटीत प्रकार घडल्यास अडचण येत असते.
रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांना आता अखंडित वीजपुरवठा होणार आहे. विजेचे बिल वेळेवर भरले जात नसल्याने शाळांचा वीज पुरवठा खंडित केला जातो. ही कटकट आता कायमची मिटणार आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सौरवीज यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. तसेच शाळांमधे पिण्याचे पाण्याची सुविधा असली तरी ते पाणी शुद्ध नसते. त्यामुळे प्राथमिक शाळेमध्ये आरओ वॉटर फिल्टर बसविले जाणार आहेत. यासाठी अर्थसंकल्पात 20 लाखांची तरतूद करण्यात आलेली आहे.