

रायगड : किशोर सुद
गेली तीन वर्षे रखडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका येत्या दिवाळीमध्ये होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुक तयारीचा नुकताच आढावा घेतला. भर दिवाळीच्या उत्सवात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी होणार आहे. रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे 59 गट आणि पंचायत समितीचे 118 गण असून राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका प्रलंबित आहेत. साधनांच्या कमतरेमुळे आयोगाला एकाचवेळी सर्वाच्या निवडणुका घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे या निवडणुका टप्प्याटप्प्याने होणार आहेत. त्यात पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होतील, असे संकेत राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात आले आहेत.
गेली तीन वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. आधी कोरोना महामारी आणि नंतर प्रभाग रचना, ओबीसी आरक्षण आदी मुद्द्यांमुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच टप्प्यात घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्यात येतील. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका आधी घेतल्या जातील. त्यानंतर महापालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका घेण्याबाबत विचार सुरू असल्याचे समजते.
येत्या दिवाळीच्या उत्सवात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी उडण्याची शक्यता आहे. रायगड जिल्हा परिषदेचे 59 गट असून 118 गण आहेत. प्रभाग रचनेचा कार्यक्रम सुरु आहे. येत्या 18 ऑगस्टनंतर प्रभाग रचनेला अंतिम स्वरुप येणार आहे.
दरम्यान, 2017 च्या निवडणुकीत शेकापने राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करून निवडणूक लढविली होती. तर शिवसेना आणि भाजपने युती करून निवडणुका लढविल्या. त्यात शेकापने 21, राष्ट्रवादीने 17 अशा 38 जागा घेऊन मोठे यश मिळविले होते. तर शिवसेना 15, भाजप 3 आणि काँग्रेसने 3 जागा मिळविल्या होत्या. असे असले तरी स्थानिक पातळीवर सोयीप्रमाणे आघाड्या आणि युत्या करण्यात आल्या होत्या. गेल्या पाच वर्षात राज्यापासून जिल्हा स्तरावरील राजकीय परिस्थिती पूर्ण बदललेली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षामध्ये दोन गट पडले आहेत. तर शेकापच्या दिग्गज नेत्यांनी भाजपची वाट धरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडेही कार्यकत्यार्र्ंचा आहे. त्यामुळे 2017 च्या तुलनेत यावेळी जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती वेगळी आहे. आता जि.प. निवडणुका तीन-चार महिन्यावर आल्याने राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लढविण्यासाठी इच्छुक तयारीला लागल्याचे दिसून येत आहे. तर राजकीय पक्षांनी कार्यकर्ते मेळाव्यांवर भर दिला आहे.
मतदान प्रक्रिया निरपेक्ष पार पडावी यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. गेल्याच आठवड्यात पेण येथील निवडणूक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) यांची राजकीय पक्ष आणि त्यांच्या प्रतिनिधींसमोर प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली. अलिबाग, पनवेल येथील काही मतदान केंद्रांतील ईव्हीएम्स राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींकडून प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले आणि ते मतदान संबंधित मतदारालाच पडते की नाही याची पडताळणी करण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाने 2011 च्या जनगणनेवर आधारीत ही निवडणूक घेण्याचे निश्चित केले आहे, पण गेल्या दहा वर्षात वाढलेले मतदार पहाता अनेक जण यावेळी मतदानास मुकण्याची शक्यता आहे. याबाबत राजकीय पक्ष काय भूमिका घेतात याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
2017 मधील स्थिती
शेकाप- 21, राष्ट्रवादी काँग्रेस 17, शिवसेना- 15, काँग्रेस- 3, भाजप- 3.
जि.प.चे 59 गट (कंसात पं.स. गण)
अलिबाग- 7 (14), मुरुड- 2 (4), पेण- 5 (10), पनवेल- 8 (16), उरण 4 (8), कर्जत- 6 (12), खालापूर- 4 (8), रोहा- 4 (8), सुधागड- 2 (4), माणगाव- 4 (8), तळा- 2 (4), महाड- 5 (10), पोलादपूर- 2 (4), श्रीवर्धन- 2 (4), म्हसळा- 2 (4).