

पोलादपूर : समीर बुटाला
महाड, पोलादपुरातील ऐतिहासिक ठेवा पाहण्यासाठी व निर्सगाचे लेणं अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक येत आहेत. प्रमुख पर्यटन स्थळांसह अनेक पर्यटक सद्यस्थितीत आंबेनलीसह ताम्हणी घाट मार्गावरील धबधबे ओसंडून वाहत असल्याने याठिकाणी तरुण तरुणीची गर्दी होत आहे. पोलादपूर तालुक्यातील मोरझोत धबधब्यावर सुद्धा स्थानिक तरुण-तरुणींसह मित्र परिवाराची शनिवार-रविवारी गर्दी दिसून येत आहे त्याच. प्रमाणे किल्ले रायगड मार्गावर सुद्धा अनेक धबधब्यांवर गर्दी वाढत आहे.
सह्याद्रीच्या पर्वत रांगातून निसर्गाच्या सौंदर्याची उधळण पाहण्यासाठी व हिरवळीने आच्छादन घातलेल्या व ढगाने पांघरलेल्या डोंगर-दर्यातून वाहणारी शुभ्र धबधबे वर्षा सहलीसाठी पर्यटकांना साद घालत आहे. मात्र या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने गेल्या काही वर्षात अनुचित प्रकार घडल्याचे दिसून आले आहे. यामुळे अनेक पर्यटन स्थळावर बंदी घालण्यात आली आहे असे असले तरी जे धबधबे आहेत त्या ठिकाणी होणारी गर्दी लक्ष्यात घेता त्या ठिकाणी उपाययोजना राबविणे गरजेचे बनले आहे.
पोलादपूर तालुक्याच्या पर्यटनाचे केंद्रबिंदू असणार्या खोपड गावच्या हद्दीतील प्रसिद्ध धबधबा मोरझोत येथे ‘आपली माती आपली माणसं’ सामाजिक संस्थेतर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पावसाळ्यात पर्यटनासाठी मोठ्या संख्येने पर्यटक मोरझोत धबधबा येथे दाखल होत असतात. मात्र आलेले पर्यटक हे मौज मजा आनंदोत्सव साजरा करत असताना मद्यपान, धूम्रपान, जैविक कचरा टाकण्यासारखे गैरकृत्य करत असतात. यामुळे परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण होते. या पर्यटकांवर निर्बंध आणण्यासाठी तहसील प्रशासनाने सार्वजनिक स्वच्छतेचे फलक लावले असून पर्यटकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. त्या दृष्टीने उपाययोजना क्रमप्राप्त बनले आहे.
महाड तालुक्यातील मांडले, नादगाव, कोंझर, केंबुर्ली येथील धबधब्यांसह अध्यात्मिक व पशु पक्षांच्या विविध अभ्यासासाठी असलेले शिवथरघळ, ऐतिहासिक वाळण कोंडी याचप्रमाणे गरम पाण्याचे झरे, सव, आदींसह पोलादपूर तालुक्यातील एस.टी. स्थानकालगतची कवींद्र परमानंदांची ऐतिहासिक समाधी आणि तेथील आधुनिक दुर्गसृष्टी पाहून वर्षासहलीला सुरूवात करता येते. शहरातील स्मशानभूमी लगतची रेव्हरंड डोनाल्ड मिशेलचे इष्टिकाचितीच्या आकाराचे थडगे, महाबळेश्वर रस्त्यावरील चोळई नदीवरील पुलावरून सावित्री आणि चोळई नदीच्या संगमाचे दृश्य, तेथील दि लेप्रसी मिशन हॉस्पिटलचा निसर्गरम्य परिसर, हिल स्टेशन कुडपण येथील भिमाची काठी या सुळक्यापर्यंत तसेच कुडपणच्या थंड पाण्याच्या धबधब्यापर्यंत जाता येते.
वर्षा सहलीसाठी येणार्या महिला वर्गाला कपडे बदलण्यासाठी विश्रामगृह किंवा खोल्या नसल्याने त्यांची मोठ्या प्रमाणावर अडचण होत आहे. पोलादपूर तालुक्यातील चांदके- खोपडचा धबधबा (मोरझोत) येणार्या महिलांसाठी जिल्हा परिषदचे विश्रामगृह उपयुक्त ठरत आहेत. त्याच धरतीवर महत्वाच्या पर्यटनस्थळी पावसाळ्याच्या हंगामात तात्पुरते निवारा सेड उभारल्यास पर्यटकांचा ओघ वाढून स्थानिकांच्या रोजगारात वाढ होईल. मात्र यासाठी ग्रामीण पर्यटकांच्या माध्यमातून व स्थानिक पर्यटन, विविध संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करणे क्रमप्राप्त बनले आहे.