

नेवाळी : शुभम साळुंके
शासनाकडून महिलांच्या बचत गटांसाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या योजनांचा महिला वर्गाकडून पुरेपूर फायदा घेतला जात असल्याचे दिसून येत आहे. अंबरनाथ तालुक्यातील कुंभार्ली गावात महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत उमेद उपक्रमाद्वारे कुंभार्ली गावातील महिला बचत गटाने मशरूम शेतीच्या आधारे उत्पन्नाचे नवे स्रोत सुरू झाले आहे.
10 महिलांच्या मुक्ताई शेतमाल बचत गटाला पाच लाखांचा निधी देण्यात आला होता. या निधीमधून महिलांनी मशरूम शेतीचा पर्याय निवडून रोजगाराची नवी संधी निर्माण केली आहे. या बचत गटाचे जिल्हाभरात कौतुक केलं जात असून मलंगगड भागातील पहिला बचत गट हा मशरूम लागवड करणारा ठरला आहे.
अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड पट्ट्यात असलेल्या कुंभार्ली गावात रघुनाथ पाटील यांच्या 15 गुंठे जागेत 3 शेड उभारून ही शेती करण्यात आली आहे. सण उत्सवांचा श्रावण महिना सुरू असल्याने मशरूम भाजीला बाजारात मागणी देखील मोठ्या प्रमाणात आहे. बचत गटाच्या सीआरपी बानू इम्तियाझ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताई शेतमाल उत्पादक गटाच्या या 10 महिलांचा समावेश आहे.
या महिलांना 20 दिवसांचे प्रशिक्षण प्रशिक्षक गजानन करंजडे यांनी दिले आहे. ग्रामीण भागातील महिलांच्या हाताला शासनाचा निधी आणि योजनांची माहिती महिलांपर्यंत पोहोचत असल्याने महिला वर्गाकडून निरनिराळे उद्योग सुरु होत असल्याचे दिसून येत आहे.
श्री मलंगगड भागातील मशरूम शेतीचा पहिलाच प्रयोग यशस्वी झाला असल्याचे दिसून आले आहे. विशेष बाब म्हणजे मागील 7 ते 8 महिन्यांपासून ही शेती अविरतपणे सुरू आहे. सीआरपी बानू शेख यांनी ही मशरुम शेतीची संकल्पना पुढे आणली होती.
उत्पन्नातून बचत गटाला नफा
महिला बचत गटांकडून सुरू करण्यात आलेल्या उद्योगांसाठी स्वतंत्र बाजारपेठ तयार करण्याचे काम शासन स्तरावर प्रस्तावित आहे. त्यामुळे कुंभार्लीत उत्पादन घेतले जाणारे मशरूम विक्रीसाठी मुंबई येथील दादर बारपेठेत विक्रीसाठी नेले जात आहेत. दिवसाला 2 हजार असे महिन्याला 60 हजारांचा नफा मुक्ताई शेतमाल गटाला होत आहे. कुंभार्ली गावातील वैजयंती पाटील, सारिका पाटील, भरती ठोंबरे, अर्चना पाटील, अनिता पाटील, ज्योती भोईर, दीपिका पाटील, सुनंदा पाटील या महिलांचा या गटात सहभाग आहे.
शासनाच्या उमेद उपक्रमाअंतर्गत कुंभार्ली गावातील महिलांनी मशरूम शेतीचा पर्याय निवडला आहे. या शेतीच्या उपासक्रमातून महिलांना चांगले उत्पन्न मिळत आहे. नाविन्यपूर्ण ग्रामीण भागात उत्पन्नाचे नवीन काही स्रोत तयार झाल्याने महिला वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
बानू शेख, सीआरपी, उमेद उपक्रम