

नागोठणे : घरातील भांडणाच्या रागातून एका पंचवीस वर्षीय महिलेने येथील अंबा नदीच्या प्रवात उडी मारली. मात्र नागोठणे पोलिसांनी तात्काळ बचाव कार्य करून या महिलेला वाचविण्यात यश मिळविले.
येथील रामनगर भागातील एक 25 वर्षीय महिला हिने घरातील भांडणाच्या रागातून 21 ऑगस्ट रोजी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास जुना नागोठणे वरवटणे ऐतिहासीक पुलावरून अंबा नदीच्या वाहत्या पाण्यात उडी मारली. सदरच्या घटनेची नागोठणे पोलिसांना माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी आपले सहकारी पोलीस हवालदार महेश लांगी, अथर्व पाटील व महेश रुईकर, पोलीस शिपाई स्वप्नील भालेराव, विक्रांत बांधणकर व सुनील वाघ यांनी घटनास्थळी पाहणी केली व तात्काळ नागोठणे पोयनाड रस्त्यावरील नवीन पूलाखाली जाऊन स्वप्नील भालेराव व सुनील वाघ यांनी पाण्यात उड्या मारून सदरील महिलेला नदीतून बाहेर काढून वाचविण्यात यश मिळविले.
सदरील महिलेला दवाखान्यात नेऊन औषोधोपचार केल्यानंतर तिची कुलकर्णी यांनी आस्थेने चौकशी केली व पाण्यात उडी मारण्याचे खरे कारण समजले. त्यानंतर कुलकर्णी यांनी सदर महिलेचे समुपदेशन केले व तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे.