

खोपोली ः पुढारी वृत्तसेवा
खालापूर तालुक्यात सध्या थंडीचा जोर वाढला आहे. त्यामुळे गावोगावी सकाळ संध्याकाळ नागरिक शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करताना दिसत आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वजण शेकोटी भोवती बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
शेकोटी चित्र पाहिल्यावर सर्वांना सहजच ’आला थंडीचा महिना, झटपट शेकोटी पेटवा’ या गीताच्या ओळी आठवत असल्याने सर्वजण शेकोटीचा आधार घेत थंडीच्या महिन्यात उबदार राहण्याचा प्रयत्न करत आहेत.
तालुक्यातील सर्वच ग्रामीण भागात सध्या थंडीचा कडाका वाढल्याने वातावरणात जोरदार गारठा जाणवत आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक सकाळ, संध्याकाळ गरमागरम चहा कॉफी पिताना व उबदार कपडे परिधान करताना दिसत आहेत. थंडीचे प्रमाण दिवसेंदिवस अधिक वाढत असल्याने हिवाळ्यातील भात शेतीला हे वातावरण पूरक असल्याने शेतकरी राजा समाधानी असल्याचे पाहायला मिळत असून या कडाक्याच्या थंडीने सर्वजण चौका चौकात व गावाच्या नाक्यावर शेकोटी पेटवत थंडीच्या महिन्याचा आनंद लुटत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या सगळीकडे आल्हाददायक असे वातावरण असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. थंडीचा हा जोर आणखी काही दिवस असाच राहण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.