

अलिबाग : चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढी पाडवा..नूतन संवत्सवाचा पहिलाच दिन. हा सण उत्साहात साजरा करण्याची उत्सुकता रायगडवासियांना लागली आहे.
रविवारी ( 30 मार्च) या नवीन मराठी वर्षाचे स्वागत करण्याची जोरदार तयारी रायगडात सुरु असून, शोभायात्रांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन यानिमित्ताने करण्यात आले आहे. यानिमित्ताने बाजारपेठात मोठी उलाढाल होत असून, गुढीपाडव्याचे औचित्य साधत अनेक कंपन्यांनी वस्तुंवर ऑफर्स जाहीर केलेल्या आहेत.
यंदाचा गुढी पाडवा रविवारी (दि.30) आल्याने सार्यांचाच उत्साह दुणावला आहे.शनिवारी गुढी पाडव्याच्या साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी केली होती.विशेष करुन झेंडूची फुले,साखरमाळा,हार,गुढीच्या काठ्या आदीसह तयार छोट्या गुढ्यांनाही ग्राहकांनी पसंती दर्शविली. पाट आणि त्यावर असलेले नक्षीदार कापड, नारळ, तांब्या, आंब्याची पाने, गुढीभोवती असलेले कापड, हार इत्यादी सर्व साहित्याचा समावेश रेडिमेड गुढीमध्येही पहावयास मिळतो.
सण उत्सव आले की विविध ठिकाणी सवलतींची बरसात होते. नवचैतन्याचा गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त असून त्यानिमित्त बाजारपेठ सजली आहे. विविध सवलती जाहीर करून व्यापारी, व्यावसायिकांनी, तर आपल्या नियोजनातील खरेदी मुहूर्तावर करण्यासाठी ग्राहकांनी तयारी केली आहे. चैत्रासह मराठी वर्षाचा प्रारंभ यादिवशी होणार असल्याने उत्साहाचे वातावरण आहे. गृह, वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सोने-चांदी आणि हिर्यांचे दागिने, स्मार्टफोनसह क्सेसीरिज आदी स्वरुपातील खरेदीला अनेकजण प्राधान्य देतात. उन्हाचा तडाखा वाढत असून फ्रीज, एअर कुलर, ए. सी., फॅन आदींची मागणी वाढली आहे.
स्मार्टफोन खरेदीवर व्यावसायिकांनी सवलतींचा वर्षाव केला आहे. त्यात ठराविक किंमतीचा स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर स्मार्टवॉच, नेक बँड आदी भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. काहींनी स्मार्टफोन अथवा क्सेसीरिज खरेदीवर हमखास भेटवस्तूंची योजना जाहीर केली आहे. यावर्षी रेडीरेकनरचे दर स्थिर राहिल्याने घरांच्या किमतीमध्ये वाढ झालेली नाही. त्याचा फायदा गृहस्वप्न साकारण्यासाठी होणार आहे.
गुढीपाडवा हा साडेतीन शुभ मुहुर्तातील पहिलाच शुभ मुहुर्त असल्याने यानिमित्ताने सोन्या,चांदीच्या वस्तु खरेदी,विक्री मोठ्या प्रमाणात होते.रायगडातील सर्वच सराफी पेढ्यांनी गुढीपाडव्याचे औचित्य साधत मोठ्या प्रमाणात सवलती जाहीर केलेल्या आहेत.अलिबागमध्ये शनिवारी 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमला दर 82,980 रुपये तर 24 कॅरेटचा दर 10 ग्रॅमला 89,660 असा होता.चांदीचेही दर 1 लाख 2500 किलो असा नोेंदला गेला. 22 कॅरेट आणि 24 कॅरेटला तीन टक्के जीएसटी लावली जाते.त्यामुळे शनिवारी अलिबागच्या सराफ बाजारात 22 कॅरेट सोन्याचा दर 85,470 रुपये तर 24 कॅरेटचा दर 92,350 रुपये असा नोेंदला गेला.चांदीलाही 3 टक्के जीएसटी लावला जातो.त्यामुळे ग चांदी किलोमागे 1 लाख 5000 या दरापर्यंत पोहोचली.