

नेरळ : आनंद सकपाळ
ममदापूर ग्रामपंचायत ही नेरळ विकास प्राधिकरणाअंतर्गत येत असल्याने, ममदापूर ग्रामपंचायत हद्दीत मोठया प्रमाणात गृहप्रकल्पांची सुरू असलेली कामे व त्या मध्येच सध्या कार्यान्वित असलेली जुनी पाणी पुरवठा योजना व वाढत्या नागरीकरणामुळे नागरीकांची तहान भागविण्यास कुचकामी ठरत असलेल्या या पाणी योजनेमुळे ममदापूर ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना सध्या प्राणी प्रश्न हा जटील आहे.
मात्र ग्रामपंचायत हद्दीतील नामवंत बिल्डरला 2 इंच पाण्याची पाईप लाईन दिल्याचे पितळ हे ग्रामस्थांनीच उघडत करत, एकीकडे ग्रामस्थ पाणी समस्यामुळे त्रस्त असताना, मात्र ग्रामपंचायत प्रशासनाकडून असा दुजाभाव का? नामवंत बिल्डरांपुढे ग्रामपंचायत प्रशासनाच्या पायघड्या का? असे प्रश्न ग्रामस्थांनकडून ग्रामसभेत उपस्थित करत प्रशासना विरोधात संताप व्यक्त करण्यात आला.
ममदापूर ग्रामपंचायतीची सन 2007 ते सन 2012 या वर्षात असलेली सात हजाराच्या लोकसंख्ये नुसार ममदापूर ग्रामपंचायतीला सन 2012 मध्ये मंजूर झालेली पाणी योजना ही रखडल्याने ती साधारण पूर्णत्वास सन 2021/22 मध्ये गेली, मात्र ममदापूर ग्रामपंचायत ही नेरळ विकास प्राधिकरणा अंतर्गत येत असल्याने या ग्रामपंचायत हद्दीमध्ये मोठया प्रमाणात गृहप्रकल्पांची सुरू झालेली कामे व त्या सुरू गृहप्रकल्पातील काही गृहप्रकल्पांची पूर्ण झालेली कामे व त्या गृहप्रकल्पांमध्ये मोठया प्रमाणात वास्तव्यास आलेले राहिवाशी यांची वाढती संख्या व वाढते नागरीकरण यामुळे सध्या कार्यान्वित असलेली जुनी पाणी पुरवठा योजनाही नागरीकांची तहान भागविण्यास कुचकामी ठरत आहे.
शासन स्तरावरून दोन वर्षापूर्वी 4 कोटीचा निधी जलजिवन मिशन योजनेअंतर्गत ममदापूर ग्रामपंचायत हद्दीतील वाढते नागरीकरण पाहाता व नागरीकांची पाणी समस्या दूर करण्याप्रती मंजूर करण्यात आली आहे. तर या पाणी योजनेच्या कामाचे भूमीपूजन हे कर्जत-खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते ग्रामस्थांच्या मोठ्या उपस्थिती मध्ये पार पडले होते.
या आधीही कांबळे नावाचे बिल्डरला 2 इंची पायाची पाईप लाईन नियमबाह्य देण्यात आली होती. त्यावेळेसही हे प्रकरण ग्रामस्थांनी उघड करत ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्षात आणून दिली. मात्र कार्यवाही शून्य असताना, आता पुन्हा हावरे या नामांकित बिल्डरला 2 इंच पाण्याची पाईप लाईन ही नंदीवरील फिल्टर पाण्याच्या मेन लाईनवरून दिल्याचा प्रकार ग्रामस्थांनी उघड केला आहे. या प्रकरणा संदर्भात अधिकार्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.
रूपेश गायकवाड, ग्रामस्थ ममदापूर
ती पाण्याची लाईन ग्रामपंचायतीच्या आधीच्या बॉडीने दिली होती. त्या पाण्याच्या लाईनवरून पाणी येत नसल्याने, पाणी येत नसल्यामुळे बिल्डरनी दुसरीकडून लाईन टाकून देण्यासाठी केलेल्या अर्जानुसार ती लाईन टाकण्यात आली आहे. या संदर्भात बिल्डरला पत्र व्यवहार केला आहे. त्याला कार्यालयामध्ये उपस्थित राहण्यास देखील लेखी पत्राव्दारे कळविले आहे.
गणेश बडे, ग्रामविकास अधिकारी, ममदापूर ग्रामपंचायत