रायगड : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील 11 हजार ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यावर प्रत्येकी 3 हजार रुपयांप्रमाणे मदत निधी वर्ग करण्यात आला आहे. जिल्ह्यात सुमारे 3 कोटी 30 लाख रुपयांचा निधी ज्येष्ठांच्या खात्यावर जमा झाला आहे. मात्र लाभार्थीनी खरेदी केलेल्या साहित्याची बिले एक महिन्याच्या आत जमा करायची आहेत. सध्या विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरू असल्याने आपल्याला बिले वेळेत सादर करता येतील की नाही याची चिंता लाभार्थींना सतावत आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेली मुख्यमंत्री वयोश्री योजना लाभार्थी वृद्धांसाठी डोकेदुखी ठरते आहे. निधी वाटप करताना या लाभार्थ्यांनी एक महिन्याच्या आत बिले जमा करणे आवश्यक असल्याची अट घालण्यात आली आहे, मात्र, ही बिले सादर करताना वयोवृद्ध नागरिकांना अडचणी सतावत असून बँक खात्यात जमा झालेले पैसे परत जाण्याची चिंता सतावू लागली आहे.
खात्यात जमा झालेल्या तीन हजार रुपयांमध्ये वृद्धापकाळासाठी आवश्यक असणार्या वस्तू खरेदी करता येणार आहेत. मात्र, असे करताना 3 हजार रुपये खरेदीची बिले समाजकल्याण कार्यालयात सादर करणे आवश्यक आहेत. सर्वच वयोवृद्धांना या वस्तूंची नव्याने खरेदी करण्याची गरज नसते, त्यामुळे कमी किमतीची खरेदी झाल्यास उर्वरित पैसे सरकार जमा करून घेणार, अशीही चिंता लाभार्थ्यांना सतावत आहे.
राज्यातील वय वर्षे 65 व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राज्य शासनाकडून सुरू करण्यात आली आहे. रायगड जिल्हयात ज्येष्ठ नागरिकांची संख्या सुमारे साडेतीन लाख आहे. योजना सुरू झाल्यापासून लाभार्थ्यांकडून योजनेला अल्प प्रतिसाद मिळत होता; मात्र, शासनाने जिल्हा स्तरावर आढावा घेत ग्रामीण भागात ग्रामपंचायत पातळीपासून यंत्रणा कामाला लावली. त्यामुळे वयोश्री योजनेसाठी ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद वाढला. रायगड जिल्हयात 27 हजार 474 ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेच्या लाभासाठी अर्ज केला आहे. त्यापैकी 18 हजार 820 अर्जांची तपासणी करण्यात आली आहे. तर 11 हजार ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यावर प्रत्येकी 3 हजार रुपयांप्रमाणे मदत निधी वर्ग करण्यात आला असल्याची माहिती रायगड जिलह्याच्या समाजकल्याण विभागाकडून देण्यात आली. 3 कोटी 30 लाख रुपयांचा निधी ज्येष्ठांच्या खात्यावर जमा झाला आहे.
माझ्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले. योजनेतील वस्तूंच्या यादीनुसार खरेदीही केली परंतु त्या वस्तूंची किंमत 3 हजार रुपये झाली नाही. खरेदी केल्यानंतर ही बिले एक महिन्याच्या आत सादर करावी असे सांगण्यात आलेले आहे, परंतु निवडणुकीच्या व्यापात ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचारीच उपलब्ध नसतात.
-शशिकला पाटील, लाभार्थी, अलिबाग
किमान 3 हजार रुपये किमतीच्या वस्तू खरेदी करून त्यांची बिले समाजकल्याण विभागाकडे सादर करावी लागणार आहेत, खात्यात जमा झालेल्या निधीचा वापर योग्य कामासाठी झालेला आहे, हे या बिलावरूनच समजणार आहे. त्यामुळे खरेदी केल्यानंतर बिले सादर करण्यासाठी वेळेची बंधने घालण्यात आलेली आहेत.
- समाधान इंगळे, (प्रभारी) जिल्हा समाजकल्याण अधिकारी, रायगड
लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात तीन हजार रुपये थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरित झाल्यावर सदर योजनेअंतर्गत येणारी उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनःस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे देयक प्रमाणपत्र 30 दिवसांच्या आत संबंधित साहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांच्याकडून प्रमाणित करून संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर 30 दिवसांच्या आत अपलोड करणे आवश्यक आहे. अन्यथा लाभार्थ्यांकडून सदर रक्कम वसूल केली जाण्याची शक्यता आहे.