

माणगाव : आधुनिक काळात रस्ते महामार्ग व दळणवळण साधनांची मुबलकता वाढली आहे. दळणवळणाच्या साधनांनी गावे, शहरे अधिक जवळ आली आहेत. पर्यटक, प्रवाशी यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी प्रत्येक गावाच्या बाहेर, मुख्य रस्त्यावर शासना मार्फत गावांची नावे विविध आकारांच्या नाव पाट्या लिहिलेल्या आहेत. गावचे स्थान दाखविणार्या या पाट्या पर्यटक प्रवासी व अनोळखी व्यक्तींसाठी अत्यंत उपयुक्त आहेत मात्र मुख्य रस्त्यावर असलेल्या या पाट्या अनेक गावाच्या नावांचा अपभ्रंश करणार्या असून अनेक वर्षापासून या पाट्या बदलल्या जात नसल्याने गावांच्या नावाचा उच्चार व लेखन चुकीच्या पद्धतीने केले जाते आहे.
गावाबाहेरील गाव नावाच्या पाट्या ह्या गावची ओळख करून देत असतात. या पाट्या गावाचे स्थान, त्याचे वैशिष्ठ्य व महत्व सांगतात. गावा च्या नावावरून अनोळखी व्यक्तींना, वाटसरू, प्रवाशांना त्याची माहिती लक्षात येते स्थान समजते. मात्र अनेक गावाच्या बाहेर असणारे गावाच्या नावांचे फलक हे चुकीच्या पद्धतीने लिहिलेले असल्याने अनेक वर्षांपासून या गावांच्या नावाचा चुकीचा उच्चार व चुकीचे नामाभिधान केले जाते आहे.
मराठी भाषेच्या शुद्ध लेखनाचा आग्रह सर्वत्र धरला जात असताना शासन स्तरावरून लावल्या जाणार्या या पाट्या अनेक वर्षापासून अशुद्धपणे लेखन केलेल्या असल्याने अनेक गावाच्या नावांचा उल्लेख चुकीचा होत आहे. यामुळे गावाच्या संस्कृती, इतर वैशिष्ठ्ये झाकोळली जात असून सामाजिक, शैक्षणिक, साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी या अशुद्ध लेखन असलेल्या नाव पाट्या बदलून शुद्ध लेखनाचा विचार करून या नाव पाट्या लिहिल्या जाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
गावाबाहेरील पाट्यांवर व्याकरणाच्या अनेक चुका दिसून येतात, वेलांटी, उकार, काना, मात्रा यांच्या हमखास चुका अनेक ठिकाणी पहावयास मिळतात. जसे आमडोशी नावाचे आमरोशी, दाखणे नावाचे दारवणे, कशेणे नावाचे कशेने, नानवळी गावचे नानिवली असे अनेक गावांच्या नावात बदल झालेले दिसून येत आहेत. हे बदल रायगड जिल्ह्यात अनेक गावांच्या बाबतीत दिसून येत असून याबाबत ग्रामस्थ, नागरिकांमध्ये नाराजी आहे.
रस्त्यांवरील गावाची ओळख सांगणार्या नाव पाट्या अत्यंत उपयुक्त व आवश्यक आहेत. मात्र अनेक गावांची नावे वेगळी व पाट्यांवरील लेखन चुकीच्या पद्धतीने केले गेले आहे. या पाट्या बदलणे आवश्यक आहे.
मनोज सुतार, शिक्षक, ग्रामस्थ.