

कळंबोली ः पनवेलला होत असलेल्या आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळा प्रमाणेच पनवेल शहरही सामाजिक,शैक्षणिक,भौगोलिक,सांस्कृतिक,औद्योगिक दृष्ट्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनवणार असल्याचे सुतवाच आमदार विक्रांत पाटील यांनी पनवेल येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केले आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरणाची बाब ही केंद्राच्या अधिपत्यात असून त्याचा पाठपुरावा निश्चित स्वरूपात महाराष्ट्र शासनाकडून सुरू आहे. त्यामुळे विमानतळाच्या नामकरणाला थोडा विलंब होऊ शकतो असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे.
आमदार विक्रांत पाटील यांनी त्यांच्या वर्षाभराच्या कालावधीत अर्थसंकल्प अधिवेशन पावसाळी अधिवेशन व हिवाळी अधिवेशन या कालावधीमध्ये केलेल्या लोकप्रमुख कामगिरीचा आढावा घेण्यासाठी पनवेल मधील पीस पार्क हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी अधिवेशन कालावधील मधील तारांकित प्रश्न, लक्षवेधी, विशेष उल्लेख, अवचित्य मुद्दे, अल्पकालीन चर्चा व अर्धा तास चर्चा यामधील एकूण 251 प्रश्न हे पनवेल तालुका व महानगर क्षेत्रातील समाजभिमुख व लोकांशी निगडित असलेले प्रश्न उपस्थित करून विकासात्मक निर्णय घेण्यात शासनाला भाग पाडले आहे. जनतेच्या जिव्हाळ्या बाबत असणारे पाणी,रस्ते, वीज, नयना बाधित प्रकल्प, पनवेलच्या सर्वसामान्यांचा जिव्हाळ्याचा असलेला एसटी बस डेपोच्या विकासाचा प्रश्न,सिडकोशी संबंधित असणारे विविध अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्न हे त्यांनी विधान परिषदेमध्ये आपल्या झंजावाती कार्यकालात मांडून पनवेलकरांचा आवाज हा विधान परिषदेमध्ये दाखवून दिला आहे.