

‘रवळनाथ’ ही ग्रामदेवता मुख्यत: तळ कोकणात आढळते; पण नाते गावातील तिचे अस्तित्व हा भाग कोकणप्रांताचे वैशिष्टय जपतो. रवळनाथ ही क्षेत्रपाल वर्गात येणारी देवता आहे. काळकाई, कुंभळजाई या भूमी देवता आहेत. तर सोमजाई ही स्थानिक ग्रामदेवता मानली जाते. अशा या ग्रामदेवतांचा महत्त्वाचा उत्सव म्हणजे जत्रोत्सव. दरवर्षी पौष महिन्याच्या पौर्णिमेस हा उत्सव साजरा केला जातो.
इलियास ढोकले, नाते
रायगडवाडी इथल्या झोलाईदेवीच्या पालखीसह अनेक गावांतील काठया येथे आणल्या जातात. त्या देवांचा छबिना उत्सव साजरा केला जातो. गावातील मानकऱ्यांचे मानपान होतात. या दिवशी ‘बगाडावर’ लाट फिरवली जाते. गळ लावण्याची प्राचीन परंपरा इथे पूर्वी पाळली जात होती. या उत्सवात अठरापगड जातींचे हजारो लोक आनंदाने सहभागी होतात. नवीन हंगामातील या तालुक्यातील पहिला आणि महत्त्वपूर्ण जत्रोत्सव असतो.
नाते हे गाव पोतनीसांचे महत्त्वाचे ठाणे बनले. त्यांच्या काळात नाते गावचे महत्त्व पुन्हा वाढू लागले. लोक गावात येऊ लागले. उत्सव पुन्हा सुरू झाले. पोतनीसांनी महाडचे ग्रामदैवत वीरेश्वरचा जीर्णोद्धार केला. वीरेश्वराच्या छबिन्यात वीरेश्वराबरोबर पालखीत बसण्याचा मान रवळनाथास दिला.
महाड छबिन्याचे महाडचे ग्रामदैवत वीरेश्वर महाराज यांच्या भेटीचे वर्णन सांगताना महाडचा छबिना उत्सव हा रायगड जिल्ह्याचा प्रमुख सांस्कृतिक उत्सव होय. महाड तालुक्यातील सर्व प्रमुख देवीदेवतांचा संगम म्हणून महाडच्या छबिना उत्सवाकडे पाहिले जाते. छबिना उत्सव जसा झोलाई, जाखमाता व वीरेश्वर यांच्या भेटीसाठी प्रसिद्ध आहे, तसाच हा उत्सव रवळनाथ आणि विरेश्वर या दोन भावांच्या भेटीसाठी देखील सर्वश्रृत आहे. श्री रवळनाथ महाराज हे नाते गावचे ग्रामदैवत होय. श्री रवळनाथ हे महाडच्या विरेश्वर महाराजांचे धाकटे बंधू म्हणून गणले जातात. श्रीवीरेश्वर व श्रीरवळनाथ यांचे लाखो भक्तगण संपूर्ण रायगड जिल्ह्यात आहेत. नाते येथे रवळनाथ महाराज यांचे पुरातन मंदिर आहे.
फाल्गुन शुद्ध द्वितीयेला श्रीवीरेश्वर महाराज यांची भव्य यात्रा म्हणजेच छबिना उत्सव असतो. या दिवशी रवळनाथ महाराज यांची पालखी नाते या क्षेत्रातून निघून महाड नगरीला आपले बंधू श्रीवीरेश्वर महाराज यांच्या भेटीसाठी जाते. रवळनाथ महाराज यांच्या पालखीसोबत शेकडो नातेकर उत्साहाने येतात. श्रीवीरेश्वर देवस्थानची पंचमंडळी मोठ्या आस्थेने लाडके बंधुराया रवळनाथ महाराज यांचे स्वागत करतात. जोपर्यंत रवळनाथ यांचे आगमन होत नाही, तोपर्यंत छबिना उत्सवातील धार्मिक विधी सुरु होत नाहीत.
रात्री जेव्हा श्रीवीरेश्वर पालखीत बसून नगर भ्रमणाला निघतात, तेव्हा त्यांच्या सोबत एकाच पालखीत रवळनाथ देखील बसलेले असतात. श्रीवीरेश्वर व रवळनाथ या आध्यात्मिक बंधूंचे हे निरलस प्रेम पाहून अनेक भाविकांचे डोळे आनंदाने भरून येतात. श्री रवळनाथ यांचे महाडच्या छबिना उत्सवात अनन्यसाधारण महत्व असून दोन भावांची ही हृद्यभेट भाविकांना तृप्त करणारी व सुखावणारी आहे. ही हृद्य भेट होताच सर्वजण जयजयकार करतात.